रत्नागिरी

कुवारबाव ब्राह्मण पंचक्रोशी सभेच्या ब्रह्मानंद ग्राहक पेठेचे उद्घाटन

रत्नागिरी दि. ९ : उच्च शिक्षण झाले की लाखो रुपयांची पॅकेज मिळाल्याने अनेक युवक, युवती उद्योगाकडे वळत नाहीत. तरुणांनी खरे तर उद्योजक बनून नोकऱ्या दिल्या पाहिजेत. रत्नागिरीत प्रक्रिया उद्योग व अन्य प्रकारच्या उद्योगांमध्ये संधी आहेत. पहिली ७ वर्षे उद्योजकाने फायदा बघू नये, असे माझ्या वडिलांनी सांगितले होते. परंतु आता समाजातूनही चांगली मदत मिळत असल्याने युवकांनी व्यवसायाकडे वळावे. निरीक्षण, मार्गदर्शनातून व्यवसायवृद्धी होते, असे प्रतिपादन रुचकर उद्योग समूहाचे संचालक सुनील सहस्त्रबुद्धे यांनी केले.

कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेतर्फे नाचणे येथील श्रीमान यशवंत हरी गोखले भवनात आयोजित ब्रह्मानंद ग्राहक पेठेचे उद्घाटन केल्यावर ते बोलत होते. याप्रसंगी ब्राह्मण सभेचे अध्यक्ष अनंत आगाशे, कार्यवाह रवींद्र रानडे, खजिनदार विलास कुलकर्णी, सदस्य अरुण गानू, सौ. आदिती भावे, सौ. नीलम जोशी, चंद्रकांत सरदेसाई, देवदत्त पेंडसे उपस्थित होते. हे प्रदर्शन दि. ९ ते ११ जानेवारीदरम्यान सायंकाळी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहणार आहे. यामध्ये २० स्टॉल्स मांडण्यात आले आहेत. उद्घाटनानंतर सर्व विक्रेत्यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी अध्यक्ष अनंत आगाशे म्हणाले की, उद्योजकांना व्यासपीठ मिळण्यासाठी, नवीन ओळखी होण्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त आहे. पदार्थ, वस्तूंना ग्राहक मिळावा. उद्योगाची वाढ व्हावी, याकरिता हे प्रदर्शन फायदेशीर आहे. कुवारबाव, खेडशी, मिरजोळे, नाचणे, पोमेंडी येथील हिंदू ग्राहकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी. गोखले भवनात दुसऱ्या व तिसऱ्या सभागृह बांधण्यात येत आहे. त्याचा उपयोग छोट्या कार्यक्रमांसाठी करता येणार आहे. यातील काही भाग लहान मुलांसाठी वेगवेगळ्या विषयांच्या शिकवणीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. पुढच्या काही वर्षांत ही ब्रह्मानंद ग्राहकपेठ मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button