गणपतीपुळे किनारा पर्यटकांनी गजबजला!

गणपतीपुळे दि. २८ : – जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गणपतीपुळे येथे सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे.

या पार्श्वभूमीवर जयगड पोलिस ठाण्याकडून विशेष पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. मंदिर परिसर आणि समुद्र किनाऱ्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. दरम्यान, किनाऱ्यावरील गर्दीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाकडून जादा पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी गणपतीपुळे येथे पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे जयगड पोलिस ठाण्याचे कर्मचारी व रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाच्या कर्मचाऱ्यांकडून पर्यटकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवले जाणार आहे.
सध्या या पर्यटनस्थळाच्या ठिकाणी नाताळ पर्यटन हंगाम सुरू असल्याने विविध ठिकाणचे पर्यटक दाखल होत असून, थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला पर्यटकांकडून मोठा प्रतिसाद मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सध्या येथील किनाऱ्यावर दाखल झालेल्या पर्यटकांकडून येथील देवदर्शन आणि समुद्रस्नानाचा विशेष आनंद लुटला जात असून समुद्रकिनाऱ्यावरील वॉटर स्पोर्ट आणि उंच आकाशातील पॅराग्लायडिंगलाही पर्यटकांची विशेष पसंती मिळत आहे.


