रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाकडून, रांजणगाव, पुणे येथे विविध अंमली पदार्थांचा नाश

रत्नागिरी दि. २७ :- रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाकडून, रांजणगाव, पुणे येथे एन.डी.पी.एस. कायद्या अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण दाखल ६५ विविध गुन्ह्यातील विविध अंमली पदार्थांचा नाश करण्यात आला आहे.
पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य-मुंबई, यांनी एन.डी.पी.एस ॲक्ट 1985 अंतर्गत दाखल गुन्ह्यातील जप्त मुद्दे माल नाश करण्याकरिता सर्व पोलीस अधीक्षक, यांना निर्देश केले होते. त्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ड्रग्ज डिस्पोजल समिती (Drugs Disposal Committee) ची स्थापना करण्यात आलेली आहे.
या ड्रग्ज डिस्पोजल समिती (Drugs Disposal Committee) समितीचे अध्यक्ष, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे, हे असून या समितीच्या सदस्य हे अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी व पोलीस उपअधीक्षक, (मुख्यालय) श्रीमती. राधिका फडके, असे आहेत.
या समितीचे अध्यक्ष श्री. नितीन दत्तात्रय बगाटे, पोलीस अधीक्षक, रत्नागिरी यांनी रत्नागिरी घटकामध्ये एन.डी.पी.एस. कायद्या अंतर्गत दाखल गुन्ह्यातील मुद्दे माल नाश करणेबाबतची कार्यवाही करणेबाबत पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रत्नागिरी श्री. नितीन ढेरे यांना पुढील निर्देश दिल्याने, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सन २०२० ते सन २०२५ या कालावधीत गुंगी कारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ या कायद्यान्वये दाखल असलेल्या गुन्ह्यांपैकी एकूण ६५ एन.डी.पी.एस. कायद्या अंतर्गत गुन्ह्यातील मुद्दे माल नाश करण्याबाबत मा. न्यायालयाकडून आदेश प्राप्त करुन घेण्यात आले व त्याप्रमाणे नमूद गुन्ह्यातील एन.डी.पी.एस. मुद्दे माल (Incineration) जाळण्याच्या पद्धतीने नाश करण्याकरिता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाकडे अर्ज करण्यात आलेला होता.
त्यानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाकडून सदर गुन्ह्यातील मुद्दे माल हा महाराष्ट्र एनविरो पॉवर लिमिटेड, एम.आय.डी.सी रांजणगाव, पुणे येथे नाश करण्याकरिता मंजूरी देण्यात आलेली होती.
त्याप्रमाणे दि. २६ डिसेंबर रोजी, ड्रग्ज डिस्पोजल समिती (Drugs Disposal Committee) चे अध्यक्ष तथा पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. नितीन दत्तात्रय बगाटे, यांच्या उपस्थितित व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे व पथकाने एन.डी.पी.एस. कायद्या अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण दाखल ६५ विविध गुन्ह्यातील नमूद मुद्देमाल पुढीलप्रमाणे आहे –
१) गांजा 82 किलो 981 ग्रॅम 75 मिलिग्रॅम
२) चरस 97 किलो 899 ग्रॅम
३) ब्राऊन हेटरॉइन 252 ग्रॅम 30 मिलिग्रॅम
४) एम.डी. 9 ग्रॅम
एकूण (181 किलो 141 ग्रॅम 105 मिलिग्रॅम)
सुरक्षितपणे महाराष्ट्र एनविरो पॉवर लिमिटेड, एम.आय.डी.सी रांजणगाव, पुणे या ठिकाणी घेऊन जाऊन मुद्दे माल जाळण्याच्या (Incineration) पद्धतीने यशस्वी रित्या नाश केलेला आहे.



