जामनगर–पोरबंदर गाड्यांना संगमेश्वर रोडला थांबा; खासदार नारायण राणे यांच्या पाठपुराव्याला यश
पोरबंदर तिरुअनंतपुरम गाडी शुक्रवारी दुपारी संगमेश्वरला थांबणार

रत्नागिरी दि. २४ : कोकण रेल्वे मार्गावरील संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकावर जामनगर व पोरबंदर येथून धावणाऱ्या तीन एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा, ही अनेक वर्षांची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे खासदार नारायण राणे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे केंद्रीय रेल्वे बोर्डाने या गाड्यांना संगमेश्वर रोड स्थानकावर थांबा देण्यास मंजुरी दिली आहे.
संगमेश्वर तालुक्यासह परिसरातील प्रवाशांना गुजरात, सौराष्ट्र भागात जाण्यासाठी थेट रेल्वे सुविधा उपलब्ध नसल्याने मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. याबाबत कोकण रेल्वे प्रशासनाने यापूर्वी तीन वेळा केंद्रीय रेल्वे प्रशासनाकडे सकारात्मक प्रस्ताव सादर केले होते. नागरिकांनीही या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. मात्र अंतिम निर्णय प्रलंबित होता. निसर्गरम्य संगमेश्वर चिपळूण संस्थेचे संदेश जिमन, बेलवलकर यांनी खासदार नारायण राणे यांच्या चिपळूण संगमेश्वर येथे झालेल्या जनता दरबारात हा प्रश्न मांडला होता.
दरम्यान, खासदार नारायण राणे यांनी हा विषय गांभीर्याने घेत केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी थेट चर्चा करत, संगमेश्वर रोड स्थानकाचे महत्त्व, प्रवासी संख्या, व्यापारी व चाकरमान्यांच्या गरजा तसेच कोकणातील वाढती वाहतूक याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांच्या ठोस हस्तक्षेपामुळे केंद्रीय रेल्वे बोर्डाकडून सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे.
थांबा मंजूर झालेल्या गाड्यांमध्ये दोन गाड्या आता संगमेश्वर स्थानकावर थांबतील. त्यामध्ये जामनगर – तिरुनेलवेली एक्स्प्रेस (गाडी क्र. 19578/19576) आणि पोरबंदर – तिरुअनंतपुरम एक्स्प्रेस (गाडी क्र. 20910/20909) यांचा समावेश आहे. तर मंजूर दोन गाड्यांपैकी पोरबंदर तिरुअनंतपुरम ( पूर्वीची कोचुवली ) ही गाडी (20910) उद्या दिनांक 25 डिसेंबर रोजी सुटणार असून संगमेश्वर थांबा घेणार आहे. संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकावर ही गाडी प्रत्यक्ष 26 डिसेंबर2025 रोजी दुपारी 3.30 वाजता येईल.
या निर्णयामुळे संगमेश्वर, चिपळूण, गुहागर तसेच आजूबाजूच्या ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. गुजरातकडे जाणारे व्यापारी, नोकरदार, विद्यार्थी आणि भाविकांना आता थेट संगमेश्वर रोड येथून रेल्वे प्रवास करता येणार असून वेळ आणि खर्चात लक्षणीय बचत होणार आहे. तसेच गुजरात मधील गिरनार या श्री दत्तगुरुंच्या पवित्र तीर्थक्षेत्राला भेट देणाऱ्या भाविकांना देखील दिलासा आहे.
या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल स्थानिक नागरिक, प्रवासी संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त करत खासदार नारायण राणे यांचे आभार मानले आहेत. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी पूर्ण झाल्याने संगमेश्वर परिसरात आनंदाचे वातावरण आहे.



