रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यातील ७ स्थानिक स्वराज्य संस्थांचा आज फैसला

रत्नागिरी दि. २१ :- रत्नागिरी जिल्ह्यातील ४ नगरपरिषदा आणि ३ नगरपंचायतींची निवडणूक ऐतिहासिक टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासकांच्या ताब्यात असलेल्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तिजोरीच्या चाव्या आता पुन्हा एकदा लोकप्रतिनिधींच्या हातात येणार आहेत. आज रविवारी या ७ संस्थांच्या निवडणुकीची मतमोजणी होणार असून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष निकालाकडे लागले आहे.

आज सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. यासाठी रत्नागिरी-नगरपरिषद कार्यालयातील संत गाडगेबाबा सभागृह, १६ टेबल, चिपळूण-युनायटेड इंग्लिश स्कूल येथील गुरुदक्षिणा सभागृह, १४ टेबल, खेड- नगरपरिषद कार्यालय सभागृह, ५ टेबल, राजापूर-नगरपरिषद सभागृह, ५ टेबल, लांजा- तहसिल कार्यालय सभागृह, ७ टेबल, देवरुख- नगरपंचायत सभागृह, ९ टेबल तर गुहागर- श्री दे.गो.कृ.मा. विद्यालय येथील सभागृह, ६ टेबल अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

रत्नागिरी, राजापूर, चिपळूण आणि खेड या नगरपरिषदांवर डिसेंबर २०२१ पासून, तर गुहागर आणि देवरुख नगरपंचायतींवर मे २०२३ पासून प्रशासक नियुक्त होते. लांजा नगरपंचायतीवर फेब्रुवारी २०२५ मध्ये प्रशासक आले होते. तब्बल ८ ते १० वर्षांनंतर या निवडणुका पार पडत असल्याने ही निवडणूक ऐतिहासिक मानली जात आहे. सोमवारपासून लोकप्रतिनिधी पुन्हा एकदा या संस्थांचा कारभार सांभाळताना दिसतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button