कोकण मराठी साहित्य परिषदेच्या विश्वस्त पदी राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. उदय सामंत यांची निवड

रत्नागिरी दि. २४ :- कोकण मराठी साहित्य परिषदेच्या विश्वस्त पदी राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. उदय सामंत यांची निवड करण्यात आली आहे.
अनेक वर्षे सातत्याने मराठी भाषा, मराठी साहित्य आणि साहित्य चळवळ वृद्धिगत होण्यासाठी ना. उदय सामंत यांचे प्रयत्न राहिले आहेत. या अनुभवाचा उपयोग कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वाटचालीत व्हावा आणि मार्गदर्शन कोकण मराठी साहित्य परिषदेला मिळावे या उद्देशाने ना. सामंत यांची कोकण मराठी साहित्य परिषदेच्या घटनेतील कलम ८ नुसार कोकण मराठी साहित्य परिषदेच्या विश्वस्तपदी निवड करण्यात आली आहे.
कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी कोकणातील लिहित्या हातांना व्यक्त होण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे आणि कोकणातील साहित्य चळवळ साहित्य क्षेत्रात लक्षणीत व्हावी यासाठी संस्थेची उभारणी केली. आज कोकण मराठी साहित्य परिषद ही साहित्य क्षेत्रात मोठे योगदान देत आहे. ना. उदय सामंत यांच्या माध्यमातून कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्य अजून उत्साहाने वृद्धिगत होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.




