
रत्नागिरी दि. ४ :- कॅरम बोर्डवर लक्ष केंद्रित करून खेळणे आवश्यक असून कॅरम हा टाइमपासचा खेळ नाही. कॅरम मधून नोकरी व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध असल्याचे महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे सदस्य नितीन लिमये यांनी फाटक हायस्कूलच्या वार्षिक क्रीडा महोत्सव अंतर्गत कॅरम स्पर्ध्येच्या उद्घाटन प्रसंगी सांगितले.
फाटक हायस्कूल व गांगण – केळकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या या शैक्षणिक वर्षातील वार्षिक क्रीडा स्पर्धेची सुरुवात कॅरम स्पर्धेच्या उद्घाटनाने झाली. शाळेचे माजी विद्यार्थी व उत्तम कॅरमपट्टू नितीन लिमये यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून सांस्कृतिक सभागृहामध्ये कॅरम स्पर्धेचे उद्घाटन झाले.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक राजन किर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. उपमुख्याध्यापक विश्वेश जोशी यांनी खेळाडूंना शुभेच्छा देताना कॅरम मधील एकाग्रता अभ्यासासाठी उपयुक्त ठरू शकेल असे सांगितले. या कॅरम स्पर्धेमध्ये इ.५ वी ते १२ वी मधून १६८ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. शाळेचे क्रीडा विभाग प्रमुख मंदार सावंत यांनी मान्यवरांचे आभार मानले. सामने यशस्वीपणे पार पडण्यासाठी शाळेच्या क्रीडा शिक्षिका बेबीताई पाटील व सेवक वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले. पाहुण्यांचा परिचय आणि उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय गावडे यांनी केले.



