सामाजिक

वार्षिक राशीभविष्य २०२६

ज्योतिर्विद्या वाचस्पती डॉ प्रसन्न मुळ्ये (DASC/JVV)

नमस्कार!

सर्व हिंदुस्थान वासियांना दीपावली आणि नूतन वर्षाच्या मनःपूर्वक कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा!!

हे नूतन वर्ष आपणांस सुखसमृद्धीचे, भरभराटीचे आणि दीर्घायुरारोग्याचे जावो. आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, हीच श्री स्वामी समर्थ महाराज चरणी विनम्र प्रार्थना!!

सध्या गुरु महाराज मिथुन राशीत विराजमान असून १ जून २०२६ रोजी कर्क राशीत प्रवेश करणार आहेत. त्यानंतर दि. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी ते शीघ्र गतीने सिंह राशीत प्रवेश करणार असून पुन्हा २४ जानेवारी २०२७ रोजी वक्री होऊन कर्क राशीत प्रवेश करणार आहेत. यावर्षी शनिदेव मीन राशीतून मार्गक्रमण करीत असून संपूर्ण वर्षभर मीन राशीतच रहाणार आहेत. राहू आणि केतु हे सध्या अनुक्रमे कुंभ आणि सिंह राशीत विराजमान असून २५ नोव्हेंबर २०२६ रोजी तेसुद्धा वक्री चालीने अनुक्रमे मकर व कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहेत. हर्षल संपूर्ण वर्षभर वृषभ राशीत, नेपच्यून संपूर्ण वर्षभर मीन राशीत आणि प्लुटो संपूर्ण वर्षभर मकर राशीत विराजमान असणार आहे.

पुरातन काळापासून १२ राशींप्रमाणे भविष्याचा विचार करण्यासाठी रविपासून शनिपर्यंत सातच ग्रहांचा विचार केला जात होता. राहू-केतूंचा शोध लागल्यानंतर त्यांचाही विचार राशीभविष्याच्या दृष्टीने करण्यास सुरुवात झाली. परंतु या कलियुगाच्या २१ व्या शतकात हर्षल, नेपच्यून आणि प्लुटो हे तीन ग्रह मानवी जीवनावर विशेषत्वाने जास्त प्रभावशाली होतांना दिसत आहेत. त्यामुळे मी माझ्या वार्षिक राशिभविष्य लेखनामध्ये त्या ग्रहांच्या मानवी जीवनावर होणाऱ्या प्रभावाचा विचार करूनच गेले काही वर्ष लेखन करीत आहे. तर आता वळूया सिंह ते वृश्चिक या चार राशींच्या सन २०२६ च्या वार्षिक राशीभविष्याकडे!

सिंह –

राशीच्या नावाप्रमाणेच आपल्या ठायी वसलेला स्वाभिमान, डौलदारपणा, पुढारीपणा, सदोदित दुसऱ्याला मदत करण्याची वृत्ती यामुळे समाजामध्ये आपण कायमच सुपरिचित असता. प्रचंड आत्मविश्वास आपल्या ठायी भरलेला असून हाती घेतलेले कार्य कितीही अडचणी आल्या तरी पूर्णत्वाकडे नेण्याचा आपला स्वभाव आहे. परंतु समाजात वावरत असतांना अनेकदा आपल्याला आपल्या स्वभावावर किंवा वागण्या-बोलण्यावर मर्यादा घालाव्या लागतात. नाहीतर त्यातून फक्त निराशाच पदरी पडते. यावर्षी गुरुमहाराज आपल्या राशीच्या लाभस्थान, व्ययस्थान आणि लग्नातून भ्रमण करणारआहेत. त्याच बरोबर सध्या आपल्या अष्टम स्थानामध्ये विराजमान असणारे शनिमहाराज वर्षभर अष्टमात राहणार आहेत. तर राशीच्या सप्तमात असणारा राहू २५ नोव्हेंबर रोजी आपल्या षष्ठस्थानामध्ये येणार आहे, तर केतू हा सध्या लग्नी असून तो आपल्या व्ययस्थानात जाणार आहे. हर्षलसारखा बलाढ्य ग्रह सध्या आपल्या कर्मस्थानात विराजमान आहे आणि अष्टमस्थानात शनि नेपच्यून युती तर षष्ठस्थानी प्लुटो आहे त्यामुळे येणाऱ्या वर्षात काही चांगल्या वाईट घटनांचा सामना आपल्याला करावा लागू शकतो. विशेषत्वाने कौटुंबिक कलह, जोडीदाराबरोबर वाद आणि अकस्मात एखाद्या जवळच्या व्यक्तीचा दुरावा सहन करावा लागू शकतो. असे असले तरी आपण आपल्या खंबीर मनामुळे सर्व परिस्थितीवर मात करून पुढे जाण्यास तत्पर रहाल. या वर्षात हाती घेतलेल्या नवनिर्मितीच्या कल्पना मूर्तरूपाने पुढे येतील. साहजिकच त्यामुळे आपणांस सामाजिक मान्यता मिळेल. या वर्षात आपल्या घरासंबंधी गोष्टींसाठी अवास्तव खर्च करावा लागेल. नवीन जागा किंवा शेतीवाडी, तसेच वाहन खरेदी करण्याची इच्छा झाली तरीही पुढील काळाचे नियोजन ठेवूनच निर्णय घ्यावा. यावर्षी मुलांकडून शैक्षणिक क्षेत्रात अपेक्षेपेक्षाही जास्त प्रगती झालेली पाहायला मिळेल. त्यामुळे पुढील शिक्षणाच्या दृष्टीने प्रवेश घेणे सोयीचे होईल आणि त्यासाठी आर्थिक खर्च कमी होईल. आरोग्याचे दृष्टीने मात्र आपण सजग राहणे अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः मे नंतरच्या काळात राहू, केतू , नेपच्यून आणि प्लुटो या ग्रहांमुळे मानसिक दौर्बल्याबरोबरच शारीरिक क्षमतेची कसोटी लागणार आहे. त्यामुळे स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देऊन या वर्षात जास्तीत जास्त तंदुरुस्त राहण्याचा प्रयत्न करा. अष्टमातील शनिमहाराज जरी आयुष्याला पुष्टी देणारे असले तरी शरीरस्वास्थ्य चांगले असणे हेच जास्त महत्त्वाचे आहे. पण गुरुचे भ्रमण जून पासून व्ययस्थानात झाल्यावर मात्र तब्येत एकदम छान होईल. भाग्याची साथ या वर्षात उत्तम लाभेल आणि आपण आपल्या स्वभावगुणांमुळे समाजात स्वतःचा वेगळा ठसा उमटवून जाल. धार्मिक, आध्यात्मिक, तसेच ज्योतिष किंवा तत्सम विद्यांमध्ये उत्तम यश लाभेल आणि प्रगतीची दारे खुली होतील. अचानक परदेशी जाण्याचे योगही येतील. विशेषतः वर्षाच्या सुरुवातीच्या कालखंडात असे योग येताना दिसून येत आहेत. सर्वसाधारणपणे व्यासायिक दृष्ट्या उत्तम प्रगती होईल. मात्र कष्टाच्या प्रमाणात मोबदला मिळणे थोडे कठीण होईल. याच काळात आर्थिक पाठबळ कमी असले तरी आपला नावलौकिक मात्र फारच मोठ्या स्तरावर जाणार आहे. सर्वसाधारणपणे १५ ऑगस्ट नंतरच्या कालखंडाध्ये आपल्या हातून काही नवनिर्मिती होण्याची दाट शक्यता आहे. या सर्वांचा विचार करत असतांना सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे होणाऱ्या खर्चांवर नियंत्रण ठवणे आणि स्वतःची प्रकृती स्थिर ठेवणे हे होय. खर्च करतांना पूर्ण विचारांतीच करा. कोणालाही उधार-उसनवार पैसे देऊ नका, परत येण्याची शक्यता फारच कमी दिसते. एकंदरीतच हे वर्ष ढगाळ वातावरणासारखे राहणार असले तरीही सिंह राशीच्या व्यक्तींना स्वप्नांची पूर्तता करणारेही ठरेल यात तिळमात्र शंका नाही.

कन्या –

बाराही राशींमधली सर्वांत बुद्धिमान राशी म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं. “ऐकावे जनाचे, करावे मनाचे” हा आपल्या राशीचा नैसर्गिक गुण आहे. यावर्षी गुरुमहाराजांचे भ्रमण आपल्या राशीच्या कर्म, लाभ आणि व्ययस्थानातून होत आहे. त्याचप्रमाणे सध्या शनिदेव आपल्या सप्तमस्थानात विराजमान आहेत. तर सध्या षष्ठस्थानात विराजमान असलेला राहू आणि व्ययस्थानातील केतू २५ नोव्हेंबर रोजी अनुक्रमे कुंडलीच्या पंचम आणि लाभ स्थानात प्रवेश करणार आहेत. एकंदरीत ग्रहस्थितीमुळे आपण सध्या थोडे निराश असलात तरीही गुरुमहाराजांच्या कृपेने आपण त्यातून बाहेर पडणारच आहात. दैनंदिन जीवनात स्वतःचाच विचार कितीही योग्य असला तरी आपल्या घरातील इतर सदस्यांचे विचार ऐकून त्यानुसार थोडे जरी बदल तुम्हला स्वतःमध्ये करता आले तरी त्याचा फायदाच होईल. मानसिक दडपणाखाली आपण सध्या असताना कुटुंबातील लोकांचा विचार हा यावर्षी प्रामुख्याने करणे आवश्यक आहे. अचानक कौटुंबिक जीवनात वादळ निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. परंतु अशा वेळेला गेले काही दिवस तुमच्या जोडीदाराच्या तब्येतीची तीव्रता कमी झाल्यामुळे तणावाच्या वातावरणातून बाहेर याल. या वर्षी शक्यतो दूरचे प्रवास करणे टाळा. नवीन काही प्रकल्प मनात असतील तर त्यावर सुद्धा पुनर्विचार करा. हाती घेतलेल्या कामात प्रत्येक बाबतीत उशीर आणि अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कोणत्याही प्रकारे गृह अथवा वाहन कर्ज घेण्यासाठी प्रयत्न करत असाल, तर नोव्हेंबर महिन्यानंतरच त्याची पूर्तता होईल. या वर्षी शैक्षणिक क्षेत्राशी निगडित असणाऱ्या व्यक्तींना उत्तम यश मिळेल. त्यामुळे पुढील प्रवेशाचे मार्ग खुले होतील. विशेषतः उच्च शिक्षणाच्या दृष्टीने तुम्हाला अपेक्षित असणाऱ्या क्षेत्रात प्रवेश करता येईल. आरोग्याच्या दृष्टीने काही ना काही छोटी मोठी आजारपणे येत राहतील. विशेषतः पायांचे दुखणे किंवा सांधेदुखी सारखे आजार याने आपण थोडेसे त्रस्त व्हाल. आपल्या जीवनाचा जोडीदार किंवा व्यावसायिक भागीदार यांच्याबरोबर बोलत असतांना तोंडावर ताबा ठेवणे महत्त्वाचे राहील. विनाकारण तुमच्याबद्दल कोणाच्याही मनात गैरसमज निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्या. वाहन चालवत असतांना विशेषतः काळजी घ्या. अगदी पायी चालत असलात तरीदेखील समोर लक्ष ठेवा. या वर्षाच्या शेवटी आपल्याला अपेक्षित आध्यात्मिक गुरुभेटीचा आनंद मिळेल. स्वतःची अध्यात्मिक पातळी वाढीला लागेल. त्यामुळे मानसिक स्थैर्य मिळेल आणि आपोआपच कोणत्याही अडचणींवर मात करण्यासाठीआपण तयार व्हाल. नोकरी व्यवसायामध्ये असणाऱ्या लोकांना मे अखेरपर्यंत कामाचा ताण वाढण्याची दाट शक्यता आहे. हाताखालचे लोक त्रास देतील. वरिष्ठांची मर्जी आपण गमवून बसलं. त्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणजे आर्थिक बाजू पहिल्या सहा महिन्यात कमकुवत होण्याची दाट शक्यता आहे. त्या दृष्टीने सुरुवातीपासूनच मिळणाऱ्या धनाचे योग्य नियोजन करणे अत्यावश्यक राहील. असे केल्यासच वर्ष अखेरीस पुन्हा जाणवणाऱ्या आर्थिक तंगीतून मुक्तता मिळेल. या सर्व गोष्टींतून एकच गोष्ट सर्वांत महत्त्वाची ठरते, ती म्हणजे विनाकारण वाढत असलेल्या खर्चावर ताबा मिळवणे. हे सर्व करत असतांना स्वतःच्या तब्येतीकडे मात्र अजिबात दुर्लक्ष करू नका. जून महिन्याआधी कोणत्याही प्रकारच्या शेअर, म्युच्युअल फंडस् इत्यादी गोष्टींमध्ये कसलीही गुंतवणूक न केलेलीच योग्य ठरेल. थोडक्यात काय, तर या वर्षी आपण मनावर ताबा ठेऊन, घरातील इतर सदस्यांचा सल्ला घेऊन, तसेच आपल्या बोलण्यावर संयम ठेवून वागलात तर निश्चितच लाभ होतील.

तूळ –

अत्यंत सुंदर, नाजूक, प्रेमळ, मोहक अशा नैसर्गिक गुणांनी परिपूर्ण असे आपण लोक. आपलं देखणेपण, मधाळ वाणी आणि समोरच्याच्या मनात काय चाललंय, याचा शोध घेणारी दृष्टी यामुळे आपण समाजामध्ये कायमच हवेहवेसे वाटणारे म्हणून ख्याती मिळवून असता. या वर्षी गुरुदेवांचे भ्रमण आपल्या राशीच्या भाग्यातून, कर्मातून आणि लाभस्थानातून होत आहे. सध्या आपल्या राशीच्या षष्ठ स्थानात शनिमहाराज संपूर्ण वर्षभर असणार आहेत. तर पंचम स्थानात असणारा राहू आणि लाभस्थानात असणारा केतू हे ग्रह देखील अखेरीला म्हणजे २५ नोव्हेंबर रोजी अनुक्रमे चतुर्थ आणि दशम स्थानात जाणार आहेत. स्वतःचं व्यक्तिमत्त्व कायमच छान, सुंदर असावं आणि दिसावं यासाठी आपण सतत प्रयत्नशील असता. परंतु कोणत्याही गोष्टीवर खर्च करत असतांना विचार केल्याशिवाय आपण एकही पैसा खर्च करत नाहीत. परंतु या वर्षी आपल्या कुटुंबाच्या दृष्टीने आपल्याला हात थोडा सैल सोडावा लागेल. आपण विचार करत असलेले किंवा सध्या हाती घेतलेले नवीन प्रकल्प मार्गी लावण्याच्या दृष्टीने प्रयत्न करताना अडचणींना सामोरे जावे लागेल. यामध्ये आपल्याला आपल्या कुटुंबाची किंवा भावंडांची साथ मिळणार नाही हे गृहीत धरून सर्व गोष्टी मार्गी लावाव्या लागतील. आईच्या तब्येतीसाठी तुमचा बराच वेळ आणि पैसा खर्च करावा लागेल. कदाचित भावंडांच्या आजारपणासाठी देखील खर्चही करावा लागेल. अर्धवट राहिलेले घराचे किंवा सदनिकेचे काम नोव्हेंबर पूर्वी मार्गी लागेल या दृष्टीने प्रयत्न करा. मनात नसतांनाही अचानक एखाद्या मोठ्या खरेदीचे योग येतील. शिक्षण क्षेत्राशी निगडित असणाऱ्या व्यक्तींसाठी हे वर्ष जास्त त्रासदायक राहण्याची शक्यता आहे. विशेषतः विद्यार्थ्यांच्या दृष्टीने विचार करता नवीन वर्षांचे प्रवेश किंवा एखाद्या विशिष्ट शाखेमध्ये प्रवेश घेण्यासाठी बरीच कसरत करावी लागणार आहे. परंतु गुरुमहाराजांच्या कृपेने आपण यातून सहीसलामत बाहेर पडाल. अध्यात्म, ज्योतिष अशा विषयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अभ्यासकांसाठी मात्र यावर्षी उत्तम संधी प्राप्त होतील. अभ्यासामध्ये प्रगती होईल. आरोग्याच्या दृष्टीने विचार करता हाडांचे विकार, सांधेदुखी, त्वचाविकार, पित्तदोष, मधुमेह यासारखे विकार उद्भवू शकतात. तब्येत बिघडल्यामुळे अचानक दवाखान्यात जावे लागणे आणि मधुमेहासारख्या विकारांचे निदान होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच स्वतःवर बंधने घाला. अनेक दिवस लांबत राहिलेले विवाहाचे योग अडचणी येऊनही यावर्षी निश्चित येतील आणि विवाहेच्छुचे विवाह होतील. प्रेमप्रकरणात त्रास सहन करावा लागेल आणि त्यामुळे मानहानी होण्याचे प्रसंग उद्भवतील. वारसा हक्काची कोर्टातील प्रकरणे यावर्षी निकालात निघतील आणि बऱ्याच काळापासून मनावर आलेले दडपण दूर होईल. धार्मिक, अध्यात्मिक गोष्टींमध्ये रुची असणाऱ्या किंवा काम करत असणाऱ्या लोकांसाठी जानेवारी ते नोव्हेंबर हा काळ अतिशय चांगला राहील. काही लोकांना याच गोष्टींसाठी किंवा तीर्थयात्रेसाठी परदेशी जाण्याचे योग येतील. व्यावसायिकांसाठी नोव्हेंबर अखेरपर्यंत कालावधी अतिशय लाभदायी राहील. गेला बराच काळ अस्थिर असणारा व्यवसाय स्थिरावून सुखाचा वर्षाव झाल्याची जाणीव होईल. त्यामुळे मन प्रसन्न राहील. मिळालेल्या लाभाचे योग्य नियोजन करणे मात्र तितकेच आवश्यक ठरेल. मात्र जानेवारी ते नोव्हेंबर हा कालावधी आर्थिक ताळमेळ घालण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा राहील. नोकरी निमित्ताने परदेशी गेलेल्या लोकांना काही कारणांनी अचानक मायदेशी परतण्याचे योग येतील. म्हणून या वर्षी शांत राहून संयमाने वागल्यास एकंदरीतच वर्ष सुखाचे जाईल.

वृश्चिक –

आपली वृश्चिक राशी म्हणजे अतीव ऊर्जेने परिपूर्ण, परंतु ती ऊर्जा भलत्याच ठिकाणी वाया घालवण्याची वृत्ती असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. ऊर्जेसोबतच तापटपणा, चिडखोरपणा आणि आक्रस्ताळी स्वभाव हे आपले नैसर्गिक गुण आहेत. यावर्षी आपल्या राशीला होणारे गुरुभ्रमण हे राशीच्या अष्टम, भाग्य आणि कर्मस्थानातून होत आहे. त्याच प्रमाणे पंचमस्थानात असणारा मीनेचा शनि वर्षभर तेथेच असणार आहे. तर चतुर्थ स्थानात असणारा कुंभेचा राहू आणि कर्मस्थानात असणारा सिंहेचा केतू हे दोन्ही ग्रह नोव्हेंबर अखेरीस अनुक्रमे मकर व कर्क या राशींत प्रवेश करणार आहेत. आपल्या कौटुंबिक सुखाचा विचार करता आपल्या कुटुंबातील सदस्यच वर्षाच्या सुरुवातीपासूनच काही कारणाने आपल्या विरोधात उभे ठाकतील. परंतु वर्ष अखेरीस यापरिस्थितीत सुधारणा होऊन वातावरण निवळेल आणि नंतरच जमीन, जागा, शेती यांमध्ये केलेली गुंतवणूक लाभ देणारी ठरेल. विशेषतः फळबागांसंदर्भातील करार हे पुढील काळात उत्तम लाभ देणारे ठरतील. मात्र घर, वाहन यासंबंधी कोणतेही व्यवहार न करणेच योग्य राहील. आधीपासूनच काही व्यवहार सुरु असेल तर शक्यतो नोव्हेंबर नंतर त्यांची पूर्तता करण्याचा प्रयत्न करावा. या वर्षात मातेच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. शैक्षणिक दृष्ट्या जे लोकं सध्या शिक्षण घेत आहेत, त्यांच्यासाठी हे वर्ष कष्टदायक राहील. निवडलेल्या शिक्षण क्षेत्रात अचानक बदल होण्याची शक्यता आहे. कोणतेही कार्य करत असतांना स्वतःकडे दुर्लक्ष करू नये. अग्नी, वाहन, वीज, अशा क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या लोकांनी सावधगिरी बाळगून काम करावे. छोट्या मोठ्या अपघातासारख्या घटना दुर्लक्ष केल्यास घडू शकतात. जोडीदाराबरोबर संयमाने वागणे आपल्यासाठी योग्य राहील. मानसिक तणाव वाढल्यास प्रकरणे न्यायालयाच्या दरवाज्यापर्यंत जाऊ शकतात. काही लोकांना वारसा हक्काने किंवा सासुरवाडीकडून अचानक लाभ होण्याची शक्यता आहे. मात्र विवाहासारखी कार्ये करतांना दक्षता घ्यावी. प्रेमप्रकरणात सुद्धा फसवणूक होऊ शकते. नोकरी-व्यवसाय करणाऱ्या लोकांनी कामाच्या ठिकाणी हलगर्जीपणा करू नये. विशेषतः व्यावसायिकांनी, त्यातही भागीदारीत व्यवसाय करणाऱ्या लोकांनी भागीदारीचे नियम पाळून व्यावसायिक निर्णय घेणे उचित राहील. नोकरी-व्यवसायातून मिळालेल्या लाभांसाठी आर्थिक नियोजन उत्तम असणे आवश्यक आहे, क्वचित प्रसंगी तोटाही सहन करावा लागेल आणि वर्ष अखेरीस आपण पुन्हा योग्य मार्गावर याल. यासाठीच वर्षभराच्या खर्चाचे नियोजन वर्ष सुरु होतानाच केलेले असेल, तर ते आपणांस निश्चितच तारून नेईल. एकंदरीतच या वर्षी कोणतेही मोठे आर्थिक निर्णय न घेता हे वर्ष आलेल्या परिस्थितीतून कसं निभावून नेता येईल याचा विचार करावा.

धन्यवाद!!

ज्योतिर्विद्या वाचस्पती डॉ प्रसन्न मुळ्ये, (DASC/JVV)

संस्थापक अध्यक्ष – “श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळ, रत्नागिरी. ISO 9001-2015 मानांकन प्राप्त संस्था

संपर्क – ९४०५९५४७२९. 

(शंका निरसन आणि मार्गदर्शनासाठी संपर्क करावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button