जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने जिल्ह्यात प्रथमच मोफत पोलिस भरती प्रत्यक्ष प्रशिक्षण
रत्नागिरी जिल्ह्यातील युवकांना नवसंजीवनी देण्याचे महत्वाचे काम जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून सुरू

तरवळ दि. २८ (अमित जाधव) :- रत्नागिरी जिल्ह्यात अल्पावधीत आपल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याने नावारूपाला आलेली जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था या संस्थेच्या वतीने जिल्ह्यात प्रथमच एक दिवसाचे मोफत पोलिस भरती पूर्व प्रत्यक्ष प्रशिक्षण रविवार दिनांक ३० नोव्हेंबर रोजी देवरुख येथील ए. एस. पी महाविद्यालयाच्या भव्य क्रीडांगणावर आयोजित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने १५०००हजार पेक्षा जास्त जागांसाठी पोलिस भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या मोठ्या प्रमाणात जाहीर झालेल्या भरती साठी जिल्ह्यातील अनेक बेरोजगार युवक युवतींनी अर्ज भरले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आपल्या कोकणातील विशेष करून रत्नागिरी जिल्ह्यातील युवक युवतींनी त्याचा जास्तीत जास्त फायदा व्हावा या उद्देशाने जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था कार्य करीत आहे. त्यासाठी या सर्व मुलांना त्याचा फायदा व्हावा जास्तीत जास्त मुल, मुली पोलीस दलात रुजू व्हावीत तसेच कोकणातील जास्तीत जास्त युवक या पोलीस दलात सामील व्हावेत, या उद्देशाने अनेक ठिकाणी मोफत प्रशिक्षण केंद्र देखिल सुरू करण्यात आली आहेत. आणि त्याच उद्देशाने जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी त्यांच्या संस्थेच्या मार्फत हे एक दिवसाचे मोफत पोलिस भरती प्रत्यक्ष प्रशिक्षण आयोजित केले आहे. या प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थींना भरतीला सामोरे कसे जावे, तसेच मैदानात भरती सुरू असताना कोणकोणती दक्षता घ्यावी, तसेच या प्रशिक्षणात सर्व प्रकारचे पोलीस भरती सुरू असताना ज्या ज्या गोष्टी घेतल्या जातात त्याचा सराव यातून घेतला घेतला जाणार आहे. तसेच सर्व प्रकारची माहिती व मैदानी सराव करून घेतला जाणार आहे. त्यासाठी काही बक्षिसे सुद्धा संस्थे मार्फत जाहीर करण्यात आली आहेत. जे प्रशिक्षणार्थी सगळ्यात जास्त चांगला प्रतिसाद देतील त्यांना रोख रक्कम देण्यात येणार आहे. तसेच इच्छुक तरुण तरुणींना प्रत्यक्ष भरतीच्या पूर्वी स्वतःचे मूल्यमापन देखील करता येणार आहे.
आता पर्यंत या भरती पूर्व प्रत्यक्ष प्रशिक्षणाला जिल्ह्यातील सुमारे १२०० ( बाराशे) पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नोंद केली आहे. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने आतापर्यंत पोलीस दलात भरती होऊन तसेच स्पर्धा परीक्षा मार्फत सुमारे ५००० पेक्षा जास्त विद्यार्थी प्रशासकीय सेवेत दाखल झाले आहेत , याचे संपूर्ण श्रेय संस्थेला जाते. संस्था कायमच सर्व सामान्य व गरीब व गरजू मूल व मुलींच्या पाठीशी ठाम उभी आहे.
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने पालघर जिल्ह्यातील विक्रम गड तालुक्यातील झाडपोळी येथे मोफत प्रशिक्षण केंद्र चालविले जाते,त्याच धर्तीवर रत्नागिरी शहरात १०० विद्यार्थ्यांचे दुसरे निवासी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार असून या ३० तारखेच्या पोलीस भरती प्रत्यक्ष नमुना भरती प्रशिक्षणातून ७० प्रशिक्षणार्थींना या निवासी पोलीस भरती व स्पर्धा परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे.
त्याच बरोबर संस्थेच्या वतीने जिल्ह्यात अनिवासी मोफत पोलिस प्रशिक्षण व स्पर्धा परीक्षा केंद्र रत्नागिरी, लांजा, सापूचेतळे, देवरुख, गुहागर, जाकादेवी या ठिकाणी सुरू आहे. संस्थे मार्फत जिल्ह्यातील १२ वी पास असलेल्या १८ ते २८ या वयोगटातील युवक युवतींनी या प्रत्यक्ष भरती प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे सचिव केदार चव्हाण, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ॲड. महेंद्र मांडवकर यांनी आवाहन केले आहे.



