रत्नागिरी

भारतीय वास्तुविशारद संस्थेच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा केंद्राचे शनिवारी उद्घाटन

रत्नागिरी दि. २० : कोकणच्या शाश्वत विकासासाठी कार्यरत राहण्याकरिता भारतीय वास्तुविशारद संस्थेच्या (IIA) रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या रत्नसिंधु केंद्राचे उद्घाटन येत्या शनिवारी दि. २२ रोजी सकाळी १० वाजता टीआरपी येथील अंबर हॉल येथे आयोजित केले आहे. या वेळी संस्थेचे महाराष्ट्र अध्यक्ष संदीप प्रभू, राष्ट्रीय सहसचिव संदीप बावडेकर, महाराष्ट्र सचिव शेखर बागुल, राष्ट्रीय मानद सल्लागार (कायदे समिती) राजीव तायशेट्ये हे प्रमुख तसेच दोन्ही जिल्ह्यांतील सदस्य उपस्थित राहणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष तथा केंद्राचे मानद संचालक मार्गदर्शक आर्किटेक्ट संतोष तावडे यांनी दिली.

या कार्यक्रमात केंद्राचे उद्घाटन, रत्नसिंधु केंद्राची नूतन कार्यकारिणी घोषणा व पदभार देण्यात येणार आहे. त्यानंतर कोकणातील आयआयए संस्थेचे धोरण याविषयी संवाद कार्यक्रम होईल. या केंद्राच्या मार्गदर्शनातून संस्था, व्यक्ती, शासन यांच्या समन्वयातून काम कसे केले जाईल आणि कोकणचा शाश्वत विकास यावर चर्चासत्र होणार आहे. याप्रसंगी कोकणच्या शाश्वत विकासात सातत्याने योगदान देणारे वास्तुविशारद व तांत्रिक सल्लागार यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

भारतीय वास्तुविशारद संस्था १०८ वर्षांचा इतिहास लाभलेली राष्ट्रीय पातळीवरची संस्था आहे. बॅचलर ऑफ आर्किटेक्चर आणि सीओए नोंदणीकृत ३० हजारांहून अधिक आर्किटेक्टची संस्था आहे. सीओए नोंदणीकृत व्यावसायिकांचे परस्पर हितसंबंध जोपासणे, तसेच या क्षेत्रातील शैक्षणिक व्यावसायिक दर्जा उंचावणे हे या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर विविध प्रकाशने, व्याख्याने, कार्यशाळा आदी विविध उपक्रम या माध्यमातून सामाजिक प्रबोधनाचे कार्य हे केंद्र करणार आहे. शहर विकास नियमावली, विविध बांधकाम योजना, पायाभूत सुविधा या दृष्टीनेही शासनाशी वेळोवेळी समन्वय साधून कोकणच्या विकासाच्या दृष्टीने सुद्धा संस्था कार्यरत राहणार आहे.

या संस्थेचे केंद्र कोकणासाठी सुरू होत असल्याबद्दल बांधकाम आणि या क्षेत्रातील संबंधित व्यावसायिक, क्रेडाई यांच्याकडून भरभरून शुभेच्छा प्राप्त होत आहेत. अशा प्रकारची संस्था येणे आवश्यक होते, हे स्वप्न आता पूर्ण होणार असल्याने या व्यावसायिकांनी पाठिंबा दिला आहे. अनेक मान्यवर व्यक्ती आणि शासन, लोकप्रतिनिधी यांच्याकडून आयआयए संस्थेच्या केंद्राचे स्वागत करण्यात येत आहे.

स्थापत्यकलेची सौंदर्यदृष्टी, शास्त्रीयता आणि कार्यक्षमता वाढवणे तसेच शिक्षण व व्यवसाय या दोन्ही क्षेत्रांत दर्जा उंचावण्याकरिता संस्था विविध उपक्रम राबवणार आहे. कोकणच्या विकासासाठी आयआयए रत्न-सिंधु केंद्राचा दृष्टिकोन महत्त्वाचा ठरणार आहे. स्थापत्यकलेचा अभ्यास, व्यवसायातील मानके उंचावणे, परस्पर सहकार्याद्वारे सर्व भारतीय स्थापत्यकारांचे हितसंबंध जपणे, असे संस्थेचे उद्देश असून या दृष्टीने रत्नसिंधु केंद्र कार्यरत राहील, अशी ग्वाही स्वागताध्यक्ष तथा केंद्राचे मानद संचालक मार्गदर्शक आर्किटेक्ट संतोष तावडे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button