रत्नागिरी

सलगपणे पाचव्यांदा सुपर रॅन्डोनिअर हा किताब पटकावणारे चिपळूणचे मनोज भाटवडेकर बनले कोकणातील पहिलेच सायकलिस्ट! 

चिपळूण दि १८ :- चिपळूण येथील मनोज भाटवडेकर यांच्यासह कराडमधील रविराज जाधव यांनी कराड ते सोलापूर असा सलग 39 तास तब्बल 600 किलोमीटर सायकल प्रवास केला आहे. दुखापतीवर मात करत या दोघांनी ऑडेक्स क्लब पॅरेशियनकडून (पॅरिस) दिला जाणारा सुपर रॅन्डोनिअर हा किताब मिळविला आहे. मनोज भाटवडेकर यांनी गेल्या चार वर्षात सलगपणे पाचव्यांदा हा किताब पटकाविला असून कोकणातील ते पहिलेच सायकलिस्ट बनले आहेत.

वाहनांच्या वाढत्या वापरामुळे प्रदुषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. त्याचबरोबर व्यायामाकडे दुर्लक्ष करत चंगळवादी संस्कृतीमुळे मानवी आरोग्याचा प्रश्न सुद्धा गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर लांब पल्ल्याचे पण कोणाचीही मदत न घेता एका वर्षात 200, 300, 400 आणि 600 किलोमीटर बीआरएम असे एकूण 1500 किलोमीटर सायकलिंग निर्धारित वेळेत पूर्ण करणार्‍या सायकलिस्टला सुपर रॅन्डोनिअर हा किताब दिला जातो. जगभरात ऑडेक्स क्लब पॅरेशियनशी संलग्न सदस्य असणार्‍या सायकल क्लबकडून बीआरएम आयोजित केल्या जातात. चिपळूण येथील सह्याद्री रॅन्डोनिअर्स हा क्लब त्यापैकीच एक असून या क्लबच्या माध्यमातून कोल्हापूर, सांगली, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा या जिल्ह्यातील सुमारे 70 हून अधिक सायकलिस्ट यांनी एसआर (सुपर रॅन्डोनिअर) होण्याचा मान मिळविला आहे. याच सह्याद्री रॅन्डोनिअर्सचे संस्थापक आणि चिपळूण सायकल क्लबचे उपाध्यक्ष श्री. मनोज भाटवडेकर यांनी 15 नोव्हेंबरला पहाटे रविराज जाधव यांच्यासोबत कराडमधील शिवतीर्थ परिसरातून 600 किलोमीटर बीआरएमला प्रारंभ केला. कराड, सातारा, लोणंद, फलटण – नातेपुते – पंढरपूर ते सोलापूर आणि तेथून रिटर्न असे 600 किलोमीटर अंतर होते. मात्र कराडमधून बीआरएमला सुरूवारत झाल्यानंतर पहिल्या 70 किलोमीटरमध्ये मनोज भाटवडेकर यांच्या पायाच्या जुन्या दुखापतीने डोके वर काढले होते. मात्र त्यानंतरही रविराज जाधव यांच्यासोबत त्यांनी शनिवार आणि रविवारी सलग दोन दिवस भर उन्हात आणि शनिवारची पूर्ण रात्र असे सलग 39 तास 42 मिनिटे सायकलिंग करत 600 किलोमीटर अंतर पार केले आहे. रविवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास मनोज भाटवडेकर यांच्यासह रविराज जाधव यांनी कराड गाठले. जिद्द आणि दुखापतींवर मात करत भाटवडेकर यांनी मिळविलेले यश प्रेरणादायी आहे. सह्याद्री

रॅन्डोनिअर्स आणि चिपळूण सायकल क्लबचे सदस्य यांच्या सहकार्य आणि पाठिंबामुळेच हे यश मिळवणे शक्य झाल्याची प्रतिक्रिया मनोज भाटवडेकर यांनी व्यक्त केली आहे.

सन 2021 साली मनोज भाटवडेकर यांनी पहिल्यांदा सुपर रॅन्डोनिअर हा किताब पटकाविला होता. त्यानंतर सन 2022 -2023 साली दुसर्‍यांदा त्यांनी हा किताब पटकाविला आहे. सन 2023 – 2024 साली दोनवेळा त्यांनी हा किताब पटकाविला होता. त्यानंतर सन 2025 साली नोव्हेंबरपूर्वी त्यांनी 200,300 आणि 400 किलोमीटर बीआरएम निर्धारित वेळेपूर्वी पूर्ण केल्या होत्या. त्यामुळेच आता 600 किलोमीटर अंतर यशस्वीपणे पार करत त्यांनी पाचव्यांदा एसआर हा बहुमान मिळविला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button