रत्नागिरी

रत्नागिरीत “गांजा” अमली पदार्थ विक्री करणाऱ्या इसमाला घेतले ताब्यात

रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याची "अंमली पदार्थ विरोधी कारवाई"

रत्नागिरी दि. १५ :- रत्नागिरीत “गांजा” अमली पदार्थ विक्री करणाऱ्या इसमाला ताब्यात घेण्यात आले असून, त्याचेकडून एकूण रु 14,600/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अमली पदार्थांना प्रतिबंध व कारवाई करण्याचे अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी यांनी सर्व पोलीस ठाणे यांना सूचना दिल्या होत्या.

त्याप्रमाणे रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे दिनांक 14/11/2025 रोजी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे हद्दी मध्ये मांडवी, पेठकिल्ला, मिरकरवाडा मागें पेट्रोलिंग करित असताना मिरकरवाडा येथील मलबार जेटीचे बाजुला असलेल्या पडीक बोटीच्या कॅबिनचे जवळ एक इसम आपल्या पाठीमागे हिरव्या रंगाची सॅक लावून संशयास्पद हालचाली करीत असताना दिसून आला म्हणून त्याला त्याचेकडे असलेल्या सॅकची चौकशी केली असता, तो उडवाउडवीची तसेच असमाधानकारक उत्तरे देऊ लागला म्हणून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण विभागातील पोलीस उपनिरीक्षक श्री. सागर शिंदे, यांनी स्वतः दोन पंचासमक्ष सदर इसमाला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने आपले नाव मोहनसिंग रामचंद्र भाट वय 26 वर्षे मुळ रा. गाव भागेश्वर, जिल्हा डडेल्धुर राज्य-नेपाळ सध्या रा. मिरकरवाडा जेटी ता. जि.रत्नागिरी असे सांगीतले तसेच त्याच्या ताब्यात असलेल्या सॅकची दोन पंचासमक्ष झडती घेण्यात आली.

मोहनसिंग रामचंद्र भाट याच्या अंगझडतीमध्ये त्याच्या ताब्यातील हिरव्या रंगाच्या सॅक मधील मधल्या कप्प्या मध्ये काळया रंगाच्या प्लास्टीक पिशवीत काळपट हिरवट रंगाची पाने, फुले, काडया व बिया असलेले वनस्पतीचे उग्र वासाचा 300 ग्राम वजनाचा “गांजा” हा अंमली पदार्थ व इतर मुद्दे माल असा एकूण रु 14,600/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

तसेच मोहनसिंग रामचंद्र भाट यास ताब्यात घेण्यात येऊन त्याच्या विरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 434/2025 एन.डी.पी.एस अॅक्ट 1985 चे कलम 8 (क), 20 (ब) ii (अ), अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस ठाणे करीत असून आरोपित मोहनसिंग रामचंद्र भाट याच्यावर या पूर्वी देखील रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 419/2024 अन्वये अमली पदार्थ संबंधी गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे तसेच त्यास मा. न्यायालयात हजर केले असता त्यास मा. न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही, कामगिरी पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी व उपविभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी उपविभाग श्री. निलेश माईनकर यांचे मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहर पोलीस ठाणे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. विवेक पाटील व पो.उनि. श्री. सागर शिंदे, पो.हवा/1399 अमोल भोसले, पो. हवा/1112 आशिष भालेकर, पो. हवा/308 कुशल हातीसकर, पो.हवा/1220 रणजित जाधव या पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button