
आरवली, दि. १ :- आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमेश्वर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आज सावर्डे येथील फार्मसी कॉलेजच्या सभागृहात आमदार शेखर निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या मेळाव्यामध्ये आगामी निवडणुका महायुतीच्या बॅनरखाली एकजुटीने लढवण्याचा आणि विजय संपादन करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
या बैठकीत धामापूर गटातून सुशील भायजे, हातीव (वांजोळे) गटातून मंगेश बांडांगळे, तसेच निवे गटातून प्रफुल्ल बाईत यांच्या उमेदवारीवर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शिक्कामोर्तब करण्यात आले. या निर्णयाचे कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
बैठकीचे अध्यक्षस्थान राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर यांनी भूषविले. त्यांनी पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेतला तसेच तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गणांतील आरक्षण व्यवस्थेची माहिती दिली. यानंतर गट व गणनिहाय सध्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. कार्यकर्त्यांनी एकमुखाने सांगितले की, आमदार शेखर निकम जो निर्णय घेतील, तेच आपल्याला मान्य असेल. आगामी निवडणुका जिंकण्यासाठी सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
आमदार शेखर निकम आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले की, “जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका महायुतीच्या रूपाने लढवायच्या आहेत. प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या भागात आतापासून कामाला सुरुवात करावी. उमेदवार कोणताही असो, त्याचा विजय महायुतीचा विजय ठरेल, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.” ते पुढे म्हणाले, “उमेदवारी देताना सामाजिक समतोल राखण्यात येईल, समाजातील सर्व घटकांचे प्रतिनिधित्व राहील, हा आमचा सोशल इंजिनिअरिंग फार्म्युला असेल.”
या मेळाव्याला व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर, जिल्हा बँकेचे संचालक व नेते राजेंद्र सुर्वे, हनीफशेठ हरचिरकर, महिला तालुका अध्यक्ष सौ. वेल्हाळ, बाळू ढवळे, अल्पसंख्यांक सेल जिल्हाध्यक्ष जाकीर शेकासन, गणपत चव्हाण, नाना कांगणे, जिल्हा उपाध्यक्ष मजीद नेवरेकर, तुकाराम येडगे, पंचायत समिती माजी सदस्य बाळा शेट्ये आदी मान्यवर उपस्थित होते.
बैठकीत राजेंद्र सुर्वे, जाकीर शेकासन, गजानन सुर्वे, सौ. वेल्हाळ आणि संजय अणेराव यांनी आपले विचार व्यक्त केले. त्यांनी संघटनबळ वाढवण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करण्याचे आवाहन केले.
या मेळाव्यात संगमेश्वर तालुक्यातील दोनशेहून अधिक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामध्ये सुशील भायजे, शशिकांत घाणेकर, लियाकत नेवरेकर, हुसेन बोबडे, बाबू सावंत, सुलतान कापडी, तुकाराम मेस्त्री, अमित जाधव, अकबर दसुरकर, तबस्सूम खाचे, अमित माचिवले, साकीब खतीब, निलेश भुवड, रुपेश गोताड, शेखर उकार्डे, संतोष भडवळकर, अख्तर खतीब, दत्ता ओकटे, मोहन ओकटे, सोहेल कडवईकर, सहदेव सुवरे, प्रज्योत पवार, बाळू इंदूलकर, संतोष बसवणकर, नासिर खलपे, संजय मापुस्कर, गुलाम पारेख, रऊफ खान, संकेत खामकर, आनंद घवाळी, नाना हळबे, चंद्रकांत गेल्ये, शफी शहा, एम.के. पवार, प्रतिक कल्याणी साळवी, संतोष बडद, मुखतार तांबू, सुरज गोपाळ, गौतम मोहिते, शफी माद्रे आदींचा समावेश होता.



