रत्नागिरी

स्थानिक गुन्हे शाखेमार्फत संगमेश्वर येथील झालेल्या चोरीच्या गुन्ह्यामध्ये एकजण ताब्यात; मुद्देमाल जप्त 

रत्नागिरी दि. १३ :- स्थानिक गुन्हे शाखेमार्फत संगमेश्वर येथील झालेल्या चोरीच्या गुन्ह्यामध्ये एकजण ताब्यात घेण्यात आले असून, त्याचेकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेला ₹18,999/-किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चोरी व घरफोडी या संदर्भातील गुन्ह्यांना प्रतिबंध व कारवाई करण्याचे अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक, श्री. नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला तसेच सर्व पोलीस ठाणे यांना सूचना दिल्या आहेत.

दिनांक 08/10/2025 ते 09/10/2025 दरम्यान राजेश तुकाराम आंबवकर यांच्या, संगमेश्वर एस.टी. स्टँड जवळील संगमेश्वर ते देवरूख जाणारे रोडवरील दत्त कृपा मोबाइल शॉपी दुकानाचे कुलूप तोडून व शटर उचकटून दुकानामधील 3 मोबाईल, 1 जीओ चा राऊटर, 1 पॉवर बँक, 1 ब्ल्यूटुथ चा हेडफोन, 1 स्मार्ट वाँच असा एकूण ₹51,499 /- किमतीचा मुद्दे माल अज्ञात चोरट्याने चोरून नेलेला होता. या अनुषंगाने संगमेश्वर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 117/2025 भा.न्या. सं चे कलम 305 (अ), 331 (4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक, रत्नागिरी अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनांप्रमाणे गुन्ह्याच्या तपासाच्या दृष्टीने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांनी गुन्ह्याच्या तपासाची दिशा ठरवून एक तपास पथक तयार करुन पथकातील अंमलदार यांना अज्ञात आरोपीच्या शोधाबाबत सूचना दिल्या होत्या.

या पथकाकडून गुन्ह्यातील घटना स्थळावरील प्राप्त सी.सी.टी.व्ही फुटेज व तांत्रिक माहीतीच्या आधारे सदरचा गुन्हा हा शंकर पाटील उर्फ शंकर साळुंखे रा. कर्जत, जिल्हा रायगड यांने केल्याची व सदरचा इसम हा सध्या शहापूर जि. ठाणे येथे असल्याची गोपनीय माहीती प्राप्त झालेली होती त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक हे सदर गुन्ह्यातील आरोपीत याच्या शोधाकरिता शहापूर व मुरबाड जि. ठाणे येथे पाठविण्यात आलेले होते.

या पथकाने गुन्हयातील आरोपीत इसम नामे शंकर अर्जुन साळुंखे उर्फ शंकर अर्जुन पाटील वय २३ वर्षे, रा. गणपती मंदीरा शेजारी, गुंडगे ता. कर्जत जि. रायगड यास दि. 11/11/2025 रोजी ताब्यात घेऊन त्याचेकडे गुन्ह्याचे अनुषंगाने चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे. त्याचे कडून गुन्ह्यातील चोरीस गेलेला ₹18,999/-किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

तसेच, आरोपीत शंकर अर्जुन साळुंखे उर्फ शंकर अर्जुन पाटील याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीमध्ये त्याने सुमारे एक महिन्यापूर्वी राजापूर येथून स्प्लेंडर मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिलेली आहे. सदर बाबत राजापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नंबर १९०/२०२५ भा.न्या.सं. चे कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल आहे.

या गुन्ह्यामध्ये शंकर अर्जुन साळुंखे उर्फ शंकर अर्जुन पाटील याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर रायगड व ठाणे अश्या २ जिल्हयांमध्ये यापूर्वी चोरी व घरफोडी सारखे एकूण ३ गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.

आरोपी शंकर अर्जुन साळुंखे उर्फ शंकर अर्जुन पाटील यास न्यायालयात हजर केले असता त्यास मा. न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास संगमेश्वर पोलीस ठाणे करीत आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक, रत्नागिरी, श्री. नितीन बगाटे व मा. अपर पोलीस अधीक्षक रत्नागिरी, श्री. बी. बी. महामुनी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांचे नेतृत्वाखाली पो. हेकॉ/909 विजय आंबेकर, पो. हेकॉ/262 विवेक रसाळ, पो.हेकॉ/1407 दिपराज पाटील, चा.पो.कॉ/215 अतुल कांबळे आदी पोलीस अंमलदार यांनी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button