
रत्नागिरी दि. १३ :- नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीवर लेखी हरकत घेण्याचा आज (सोमवार, १३ ऑक्टोबर २०२५) शेवटचा दिवस असताना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते बाळ माने यांनी ही मुदत वाढवून देण्याची मागणी केली आहे. यादीतील त्रुटी आणि सदोष बाबींची कल्पना देत त्यांनी थेट रत्नागिरी नगर परिषदेत धाव घेतली आणि प्रशासक तथा मुख्याधिकारी वैभव गारवे यांची भेट घेतली.
बाळ माने यांनी मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करताना, मतदार यादीतील अनेक त्रुटी आणि सदोष बाबी निदर्शनास आणून दिल्या. या त्रुटींमुळे अनेक मतदारांना आपले नाव तपासण्यात किंवा हरकती नोंदवण्यात अडचणी येत असल्यामुळे, राज्य निवडणूक आयोगाला यासंदर्भात माहिती देऊन हरकतींसाठी असलेली मुदत वाढवून देण्याची विनंती त्यांनी केली.
मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी बाळ माने आणि सोबत आलेल्या शिष्टमंडळाचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकून घेतले. लेखी स्वरूपात आक्षेप नोंदवल्यास त्यावर योग्य समाधान केले जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते मिलिंद कीर, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख प्रशांत साळुंखे, विभाग प्रमुख साजिद पावसकर, उप शहर प्रमुख सलील ढापळे, नितीन तळेकर, सौ. राजश्री शिवलकर, बिपिन शिवलकर, तालुका प्रमुख शेखर घोसाळे तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. प्रारूप यादीतील त्रुटी दूर करून निवडणुकीची प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक व्हावी, या उद्देशाने ही मागणी करण्यात आल्याचे बाळ माने यांनी सांगितले. हरकती नोंदवण्यासाठी मुदतवाढ मिळते का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



