रत्नागिरी

मानवी आरोग्य म्हणजे काय?

तुम्हाला कोणी विचारले की तुम्ही निरोगी आहात का? तुम्ही लगेच काय म्हणाल बरं ! “हो, मला काही त्रास नाही, बीपी नाही, शुगर नाही माझं सगळं नॉर्मल आहे.” पण खरंच एवढंच म्हणजे आपले आरोग्य असते का?

WHO म्हणते की रोग नसणे म्हणजे आरोग्य नव्हे. आयुर्वेदाने तर ५००० वर्षांपूर्वीच आरोग्याची परिपूर्ण व्याख्या केली आहे.

समदोषः समाग्निश्च समधातुमलक्रियः। प्रसन्नात्मेन्द्रियमनाः स्वस्थ इत्यभिधीयते।।

याचा साधा अर्थ असा आहे की ज्याचे तीन दोष (वात, पित्त, कफ) सम आहेत, पचनाचा अग्नी सम आहे, शरीरातील सात धातू व्यवस्थित आहेत, मल-मूत्र क्रिया सुरळीत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ज्याचे मन, इंद्रिये आणि आत्मा प्रसन्न आहे तोच खरा स्वस्थ आहे . निरोगी आहे .

एकदा माझ्याकडे दोन महिला भगिनी आल्या होत्या . दोघींचे वय ४० च्या आसपास असेल . दोघींचेही सर्व ब्लड रिपोर्ट नॉर्मल होते.

पहिली म्हणाली , “ताई, सकाळी उठले की उत्साह वाटतो, भूक लागते, दिवसभर काम करूनही थकवा येत नाही, रात्री शांत झोप लागते.”दुसरी म्हणाली , “सगळे नॉर्मल आहे पण सतत थकवा येतो, कशातच मन लागत नाही, चिडचिड होते, झोपेतून उठल्यावरही फ्रेश वाटत नाही.”

रिपोर्टनुसार दोघीही तशा निरोगी आहेत. पण आयुर्वेदानुसार पहिली स्वस्थ आहे आणि दुसरी अस्वस्थतेच्या वाटेवर आहे.

म्हणून आरोग्य म्हणजे फक्त शरीर नाही. ते तर चार पायांचे टेबल आहे .शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक अशा चार पायावर आपले आरोग्य उभे असते. त्यातील एक पाय जरी हलला तरी टेबल डगमगते.

आपण चूक काय करतो बघा . आपण आरोग्याला सुट्टीच्या दिवशी करायची गोष्ट समजतो. “उद्यापासून व्यायाम सुरू करेन” म्हणतो. पण श्वास घ्यायला आपण उद्याची वाट पाहतो का?

या लेखमालेत आपण हेच शिकणार आहोत की आरोग्य म्हणजे काय आणि ते रोजच्या जगण्यातून कसे जपायचे तेही कोणत्याही महागड्या औषधाशिवाय.

लतिका पेजे – ताम्हणकर, रत्नागिरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button