रत्नागिरी

अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी सर्व जिल्हा बँकांनी एकत्र येऊन सामुदायिकरित्या प्रयत्न करावेत – आमदार प्रविण दरेकर

रत्नागिरी दि. ६ :- समुह पुनर्विकास प्राधिकरण, दि महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या., पुणे व मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री. प्रविण दरेकर, आमदार गटनेते विधान परिषद यांनी बँकेस सदिच्छा भेट दिली. त्यावेळी बँकेचे संचालक ॲड. दीपक पटवर्धन यांनी बँकेतर्फे श्री. दरेकर यांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन आदरपूर्वक सत्कार केला. यावेळी बँकेचे अध्यक्ष कृषीभुषण डॉ. तानाजीराव चोरगे यांनी भ्रमणध्वनीवरून श्री. दरेकर यांना शुभेच्छा दिल्या.

बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधिर गिम्हवणेकर यांनी, रत्नागिरी जिल्हा बँकेच्या आर्थिक प्रगतीचा उल्लेख करताना बँकेचे सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात ₹५,०००/- कोटीचा व्यवसाय पूर्ण केल्याचे, त्याचबरोबर २०२३-२४ या आर्थिक वर्षात बँकेच्या सभासदांना ३०% एवढा उच्चांकी लाभांश दिला असल्याचे सांगितले.

बँकेचे संचालक ॲड. दिपकजी पटवर्धन यांनी जिल्हा बँकांना कामकाजात येणाऱ्या अडचणी मांडल्या. नवीन शाखा उघडण्यास मान्यता मिळण्यामध्ये विलंब होतो. कोकणातील ७/१२ वर एकापेक्षा अधिक व्यक्तींची नावे असल्यामुळे कर्जव्यवहार करणेमध्ये अडचणी निर्माण होत आहेत. वसुलीकरिता मिळालेले अधिकार बोथट होत आहेत. अशा प्रमुख अडचणी सांगून याबाबतचे निवेदन प्रविण दरेकर यांचेकडे सुपूर्द करून त्याच्यावर शासन स्तरावर या अडचणींबाबत पाठपुरावा करून जिल्हा बँकेला दिलासा देण्याचे काम होणेबाबत विनंती केली.

श्री. प्रविण दरेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, प्रथमतः त्यांनी रत्नागिरी जिल्हा बँकेचे आभार मानले. महाराष्ट्र राज्य संघाची स्थापना १०६ वर्षांपूर्वी म. गांधीजी यांनी केली. या संघाचे अध्यक्ष पद भुषविणेचे भाग्य मला लाभले. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

ते आपले मनोगत व्यक्त करताना पुढे म्हणाले की, जिल्हा बँकांनी सतत नाविण्यपूर्ण प्रयोग करून आपली प्रगती साधावी. त्याचप्रमाणे फलोत्पादन प्रक्रिया, मासेमारी व टुरिझम व्यवसाय संस्था उभ्या करण्यासाठी प्रयत्न करावेत. जिल्हा बँकांनी नवीन प्रकल्पांसाठी प्रयत्न करावेत. कोकणातील सर्व जिल्हा बँका “अ” वर्गात आहेत. अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी सर्व जिल्हा बँकांनी एकत्र येऊन सामुदायिकरित्या प्रयत्न करावेत. त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अडचणी दूर करण्यासाठी ते प्रयत्न करतील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. त्याचप्रमाणे कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांकरिता ७/१२ उताऱ्यामध्ये १० गुंठे अट शिथिलता, वैयक्तीक कर्जमर्यादेमध्ये वाढ, वसुली कामकाजाबाबतच्या अटींबाबत तसेच संस्थांचे पोटनियमामध्ये त्या अनुषंगाने बदल करणेबाबत आवश्यक ते प्रयत्न करणेत येतील, अशी ग्वाही दिली.

सदर कार्यक्रमासाठी बँकेचे संचालक ॲड. दीपक पटवर्धन, श्रीम. दिशा दाभोळकर, श्री. जयवंत जालगांवकर, श्री. अमजद बोरकर, श्री. गजानन पाटील, श्री. मधुकर टिळेकर, श्री. राजेंद्र सुर्वे, श्री. महेश खामकर, श्री. रामचंद्र गराटे तसेच जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधिर गिम्हवणेकर तसेच अधिकारी कर्मचारी व सहकारातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे शेवटी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधिर गिम्हवणेकर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button