
जैतापूर दि. ५ (राजन लाड) : – राजापूर तालुक्यातील दळे व परिसरातील शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्तीचे सावट पुन्हा एकदा घोंघावत आहे. ऑक्टोबर महिना सुरू होऊनही पावसाची सततची बरसात काही थांबलेली नाही. त्यातच या मुसळधार पावसामुळे भातशेतीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊन तोंडाशी आलेला घास हिरावून नेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
या भागातील अनेक शेतकऱ्यांचे भात पिक आता काळसर पडू लागले असून, संपूर्ण पीक नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे महिन्यांनंतरचे श्रम आणि गुंतवणूक दोन्ही वाया जाण्याची शक्यता आहे.
दळे येथील शेतकरी संजय शंकर लासे यांनी या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधले आहे. त्यांनी सांगितले की, “करपा रोगामुळे संपूर्ण भात कुरूप झाला आहे. आम्ही कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार कळवूनही अद्याप कोणी पाहणीस आलेले नाही. त्यामुळे प्रसार माध्यमांनी आवाज उठवून शासनाचे लक्ष या प्रश्नाकडे वेधावे, अशी आमची विनंती आहे.”
या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी असून, कृषी विभागाच्या निष्क्रियतेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ‘आम्ही शेती करून पोट भरणारे लोक; पण आता पिकच गेलं तर जगायचं कसं?’ असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.
शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाईची मागणी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, हवामानातील अनियमिततेमुळे शेतीचे नुकसान वाढले असून, शासनाने त्वरीत परिस्थितीचा आढावा घेऊन मदत जाहीर करावी अशी सर्वसामान्य अपेक्षा आहे.
दरम्यान, दळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन पुढील काही दिवसांत स्थानिक कृषी कार्यालयात निवेदन देण्याचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, “आम्ही प्रशासनाकडे मदतीची याचना करत आहोत. जर अधिकारी वेळेवर आले नाहीत तर आम्ही एकत्र येऊन आंदोलनाचा मार्ग पत्करू.”
राजापूर तालुक्यातील दळे परिसरात सध्या पिकांची परिस्थिती गंभीर बनली असून, हवामान स्थिर न झाल्यास आणखी मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शेतकऱ्यांची पंचनामा मागणी
करपा रोगग्रस्त शेतीचा तातडीने पंचनामा कृषी विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून मदत जाहीर करावी. तसेच हवामानातील बदलामुळे होणाऱ्या नुकसानीसाठी कायमस्वरूपी योजना तयार करावी.
शेतकऱ्यांचे डोळे आता प्रशासनाच्या मदतीकडे लागले आहेत. शासनाने वेळेवर पाऊल उचलले, तरच दळे भागातील शेतकरी संकटातून बाहेर पडतील, अशी आशा व्यक्त होत आहे.



