गावठी बॉम्ब बाळगणाऱ्या एकाला पोलिसांनी केले जेरबंद; ७० जिवंत गावठी बॉम्ब जप्त

रत्नागिरी दि. २९ :- रत्नागिरी पोलीस दलामार्फत गावठी बॉम्ब बाळगणाऱ्या एकाला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून ७० जिवंत गावठी बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बेकायदेशीर स्फोटक पदार्थाविरोधात प्रतिबंध व कारवाई करण्याचे अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी यांनी सर्व पोलीस ठाणे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस सूचना दिल्या होत्या.
त्याच अनुषंगाने दिनांक 28/01/2026 रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक खेड उपविभागामध्ये पेट्रोलिंग करीत असताना खेड-मंडणगड रस्त्यावर मौजे मुगीज येथे सायंकाळी सुमारे 17.25 वा. संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका इसमास ताब्यात घेण्यात आले.
तपासादरम्यान सदर इसमाचे नाव प्रकाश राम जगताप, वय 33 वर्षे, रा. शिरखल, ता. दापोली, जि. रत्नागिरी असे असून, त्याच्या ताब्यातून बेकायदेशीररीत्या स्फोटक पदार्थ सदृश 70 जिवंत गावठी बॉम्ब तसेच एक चारचाकी वाहन असा एकूण ₹2,35,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी प्रकाश राम जगताप, वय 33 वर्षे, रा. शिरखल, ता. दापोली, जि. रत्नागिरी कडील स्फोटक पदार्थ सार्वजनिक सुरक्षिततेस गंभीर धोका निर्माण करणारे असल्याने त्यास तत्काळ ताब्यात घेऊन दापोली पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 15/2026 भारतीय स्फोटक कायदा 1908 कलम 5 तसेच भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 288 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे तसेच सदर गुन्ह्याचा अधिक तपास दापोली पोलीस ठाणे करीत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच बेकायदेशीर स्फोटक पदार्थाविरोधात कठोर पावले उचलण्यात येत असून, नागरिकांनी कोणतीही संशयास्पद माहिती तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यास अथवा डायल 112 या संपर्क क्रमांकावर कळवावी, असे आवाहन रत्नागिरी पोलीस दलामार्फत करण्यात येत आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेणी. पो.उनि प्रशांत बोरकर, पो.हवा/909 विजय आंबेकर, पो.हवा/265 योगेश नार्वेकर, पो.हवा/1407 दिपराज पाटील, पो.हवा/1410 सत्यजित दरेकर व चा. पोशी/२15 अवल कांबळे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.


