साडवली जि. प. गटात अटीतटीची निवडणूक; रवींद्र माने व रश्मी कदम यांच्या अस्तित्वाची लढाई

देवरूख दि. २९ (सुरेश सप्रे ) :- संगमेश्वर तालुक्यातील साडवली जिल्हा परिषद गटात यावेळी राजकीय लढत कमालीची रंगतदार ठरणार असून ही निवडणूक थेट भाजपा व उबाठा यांच्यात होणार असून ही लढत अटीतटीची होण्याची चिन्हे दिसत आहेत.
उबाठा शिवसेना गटाकडून माजी जिल्हा परिषद सदस्या नेहा माने या पुन्हा एकदा रिंगणात उतरल्या असून त्यांना भाजपाच्या रुपाली कदम या थेट टक्कर देण्यासाठी निवडणूक मैदानात उतरल्या आहेत.
नेहा माने या अनुभवी नेत्या असून त्यांनी यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा मध्यवर्ती बँके संचालक म्हणून प्रभावी कामगिरी बजावली आहे. जिल्हा परिषदेच्या विविध समितीवर त्यांनी केलेले काम विकासकामांबाबतचा अनुभव आणि प्रशासकीय अभ्यास यामुळे त्यांची प्रतिमा काम करणारी नेत्या अशी आहे. विकासकामांचा ठोस अनुभव हा यांचा मोठा प्लस पॉइंट मानला जात असून उबाठा गटाकडून त्यांच्यावर मोठा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
तर दुसरीकडे भाजपाकडून तालुकाध्यक्ष रुपेश कदम यांच्या पत्नी रुपाली कदम या राजकारणात नवीन असल्या तरी नव्या दमाच्या उमेदवार म्हणून मैदानात उतरल्या असून त्यांना स्थानिक पातळीवर चांगला प्रतिसाद मिळत आहे. तरुण मतदार, महिलांचा पाठींबा व विश्वास यामुळे ही लढत अधिकच चुरशीची होत चालली असल्याचे दिसून येते आहे. दोन्ही बाजूंनी प्रचारात जोरदार तयारी सुरू असून दावे प्रती दावे सुरू आहेत. सौ नेहा माने या माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांच्या पत्नी आहेत तर रुपाली कदम या माजी जिप अध्यक्षा रश्मी कदम यांच्या सुनबाई आहेत.
माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांनीच ज्यांना राजकारणात आणून जिप सदस्य केल्याने अध्यक्ष पदावर काम करणेची संधी मिळाली त्या रश्मी कदम आता बदलत्या राजकीय परिस्थितीत मानेच्या विरोधात आमनेसामने असल्याने साडवली जि. प. गटातील ही निवडणूक संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधून घेत आहे. अनुभव विरुद्ध नव्या नेतृत्वाची ही लढत कोण जिंकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



