कोणत्याही परिस्थितीत कोकणातील कुणबी समाजावर अन्याय होणार नाही – रत्नागिरीचे पालकमंत्री ना. डॉ. उदय सामंत

रत्नागिरी दि. १ :- हैद्राबाद गॅजेटियर बाबत शासनाने जे परिपत्रक काढले आहे, याचा कोकणातील तिल्लोरी कुणबी बांधवांवर अन्याय होऊ शकतो अशी त्यांची भूमिका आहे. त्यांच्या शंकाचे निरसन करण्यासाठी कोकणाच्या भूमिपुत्रांसमवेत शासन स्तरावर एक बैठक घेण्याची विनंती आपण राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना करणार असल्याची माहिती रत्नागिरीचे पालकमंत्री ना. डॉ. उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोणत्याही परिस्थितीत कोकणातील कुणबी समाजावर अन्याय होणार नाही, असे ना. सामंत यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, आजच्या बैठकीत रत्नागिरी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि मराठा आरक्षण समिती सदस्य म्हणून आपण त्यांच्या शंका दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी कोकणच्या या भूमिपुत्रांची एक बैठक आयोजित करण्याची विनंती आपण मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना करणार आहे. तसेच दोन्ही कमिटीमधील माजी न्यायमूर्ती यांचे समवेतही बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले.
कोणत्याही परिस्थितीत कोकणातील कुणबी समाजावर अन्याय होणार नाही. त्यांचे काहीही नुकसान होणार नाही, अशी भूमिका शासनाची आहे आणि भविष्यातही राहणार आहे. जर शंकाचे निरसन झाले नाही, त्यांना शंकामध्ये तथ्य वाटत असेल तर एक मंत्री म्हणून मी त्यांना विश्वास दिला आहे की, जोपर्यंत शंका दूर होत नाही, एक कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्यासोबत असेन. शेवटी सगळ्याच समाज घटकाला न्याय देणे आणि समाज घटकाला जो न्याय दिलेला आहे तो कमी न होणे ही शासनाची जबाबदारी आहे, असे ना. सामंत यांनी स्पष्ट केले.



