रत्नागिरी

आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात एनएसएस विभागाचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न

देवरुख दि. १३ ( प्रतिनिधी ):- देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत निबंध स्पर्धा, देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा, मेहंदी रेखाटन स्पर्धा, रांगोळी आणि टिपरी नृत्य स्पर्धा इ. स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्त निबंध स्पर्धा, घोषवाक्ये स्पर्धा व चारोळी लेखन स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमधील बक्षीसप्राप्त विद्यार्थ्यांसाठी बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता.

बक्षीस समारंभाची सुरुवात कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वतीपूजन करून करण्यात आली. यानंतर ११वी कला वर्गातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजना गीत सादर करून, उपस्थितांची शाबासकी मिळवली.या कार्यक्रमासाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. लुंगसे अध्यक्षस्थानी होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अभ्यासाबरोबरच इतर कलागुणांचा विकास करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगितले. विविध क्षेत्रांत सहभागी होऊन स्वतःचा सर्वांगीण विकास घडवून आणावा, असे त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी कुमारी आकांक्षा शिवगण, तर आभार प्रदर्शन कुमारी अक्षरा कांबळे यांनी केले. बक्षीसांच्या यादीचे वाचन प्रा. वसंत तावडे यांनी केले. या कार्यक्रमाला प्रा. सीमा शेट्ये, शिक्षक प्रतिनिधी प्रा. संदीप मुळ्ये, लेफ्टनंट प्रा. सानिका भालेकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. सीमा कोरे, प्रा. शिवराज कांबळे, प्रा. स्वप्नाली झेपले, प्रा. देवयानी जोशी, प्रा. विजय मुंडेकर, प्रा. मयुरेश राणे आणि ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे यांनी मेहनत घेतली. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button