स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कारवाईमध्ये गोवंश वाहतूक करणाऱ्या दोन इसमांवर कारवाई

रत्नागिरी दि. २३ – जिल्ह्यामध्ये गोवंश वाहतूक व कत्तल संदर्भातील गुन्ह्यांना प्रतिबंध व कारवाई करण्याचे तसेच त्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या अनुषंगाने रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी यांना सूचना दिल्या होत्या.
त्या अनुषंगाने दि. २२ सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक लांजा उपविभागामध्ये गस्त करत असताना राजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाचल ते जवळेथर जाणाऱ्या रोडने गगनबावडा घाटमार्गे अवैध व बेकायदेशीरपणे गोवंश जनावरांची वाहतूक होणार होणार आहे, अशी विश्वसनीय बातमी मिळाल्याने हे पथक पाचल येथे वाहनांची तपासणी करण्याकरिता दि. २३ सप्टेंबर रोजी थांबले व वाहनांची तपासणी करीत असताना एक टाटा कंपनीची वाहन MH-08-AP-0254 हे वाहन थांबवून त्याची तपासणी केली असता या वाहनाच्या हौद्यामध्ये एकूण १३ गोवंश जातीची जनावरे यांना दोरीच्या सहाय्याने दाटीवाटीने जवळ-जवळ बांधलेले मिळून आले.
या गाडीतील गोवंश जनावरांना गाडीतील हौदयात पाणी न देता गाडीमध्ये वेदना किंवा यातना होतील अशा रीतीने दोरीने बांधून तसेच त्यांच्या खाद्याची कोणतीही व्यवस्था न करता, त्यांच्या कत्तलींकरिता वाहतूक करीत असताना मिळून आले म्हणून या गोवंश जनावरांच्या गाडीच्या चालकाकडे अधिक चौकशी केली असता त्याच्याकडे गोवंश जनावरे वाहतुकीचा परवाना अगर पशु-वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून वैद्यकीय तपासणी केली नसल्याचे त्याने सांगीतले म्हणून दोन पंचांसमक्ष त्याचे नाव-गाव विचारले असता चालकाने आपले नाव 1) सलमान मुस्ताक बलबले वय 35 वर्षे रा. बलबले मोहल्ला तालुका राजापूर व 2) संजय दत्तराम पाटणकर वय 48 वर्षे रा. कुंभवडे रामणवाडी तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी असे सांगितले तसेच या दोन्ही इसमांकडे गोवंश जनावरे कोठून आणली याबाबत विचारणा केली असता त्यांनी ही गोवंश जनावरे तळगाव कोंडे येथे राहणारा काजी मोहम्मद उर्फ पांड्या यांच्याकडून आणल्याचे सांगीतले.
या वाहनामध्ये मिळून आलेली एकूण १३ गोवंश जनावरे कत्तल करण्यासाठी गैर कायदा बिगर परवाना अवैधरित्या वाहतूक करून घेऊन जात असल्याचे निष्पन्न झाले म्हणून वरील नमूद तीनही इसमांवर राजापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा. रजिस्टर नंबर 179/2025 प्राण्यांचे छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम 11 (1), 11 (1) (h), 11(1)d, 11(3)c, सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 चे कलम 5 (अ), 5 (ब) व 9 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 119 सह मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 66/192, प्राण्यांची वाहतूक नियम 1978 चे कलम 47,48,49,50,51,54,56 भा. न्या. सं 2023 चे कलम 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
या गुन्ह्याचा अधिक तपास सुरु असून या गुन्ह्यामध्ये एकूण 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले आहे व एक वाहन मिळून ₹ 12,05,000/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे तसेच १३ गोवंश गुरांची सुटका करण्यात आलेली आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांचेसह स.पो.फौ. / 1188 सुभाष भागणे, पो.हवा/477 नितीन डोमणे, पो.हवा/301 पालकर, पो.हवा/1067 कदम व पो.हवा/1238 प्रवीण खांबे यांनी केलेली आहे.



