देव-घैसास-कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाच्या तृतीय वर्ष विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ उत्साहात संपन्न

रत्नागिरी दि. ५ :- भारत शिक्षण मंडळाचे देव-घैसास-कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी येथे समारंभ समिती, परीक्षा विभाग आणि आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने तृतीय वर्ष विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ उत्साहात झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. विनय कलमकर यांनी केले. या वेळी तृतीय वर्ष कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त करत महाविद्यालयातील तीन वर्षांच्या आठवणींना उजाळा दिला.
संस्था विश्वस्त विनायक हातखंबकर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. भारत शिक्षण मंडळाचे कार्यवाह धनेश रायकर यांनी विद्यार्थ्यांना सक्षम होण्यासाठी बहुमोल मार्गदर्शन केले. कार्याध्यक्ष श्रीराम भावे यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या सौ. मधुरा पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत “मोठी स्वप्न बघा, मेहनत घ्या आणि स्वतःवर विश्वास ठेवा” असा संदेश दिला. तसेच संस्था अध्यक्षा सौ.नमिता कीर यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तृतीय वर्ष कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाला एक आठवण म्हणून भेटवस्तू दिली.
या कार्यक्रमाला विक्रम लाड (संस्था सदस्य), सौ. वसुंधरा जाधव (उपप्राचार्या), सर्व प्राध्यापक, तृतीय वर्षाचे सर्व विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. मिथिला वाडेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. वैभव घाणेकर यांनी केले.



