कृषीरत्नागिरी

वनोशी तर्फे पंचनदी येथे अझोल्ला निर्मितीचे प्रात्यक्षिक; दूध उत्पादनात १५ टक्क्यांपर्यंत वाढीचा कृषी तज्ज्ञांचा दावा

वनोशी तर्फे पंचनदी दि. ७ सप्टेंबर (सागर गोवळे) : ग्रामीण कृषी जागरूकतेचा भाग म्हणून (RAWE कार्यक्रमांतर्गत) कृषी सखी गटामार्फत वनोशी तर्फे पंचनदी (धातोंडी वाडी) येथील शेतकरी श्री. लक्ष्मण उजल आणि श्री. अरुण उजल यांच्या शेतावर ‘अझोल्ला’ उत्पादन तळ्याची उभारणी व प्रत्यक्ष प्रात्यक्षिक यशस्वीरीत्या पार पडले. पशुधनासाठी अत्यंत पौष्टिक व पूरक खाद्य म्हणून अझोल्लाचा वापर वाढवणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

या प्रात्यक्षिकादरम्यान ६×३×१ फूट आकाराचा खड्डा खोदून, ताडपत्रीच्या साहाय्याने पाझर रोखत ७ ते ८ इंच स्वच्छ पाणी भरण्यात आले. त्यानंतर ३ किलो शेण, ३ किलो माती व ३० ग्रॅम एसएसपी (SSP) खताची तयार स्लरी पाण्यात मिसळून त्यात अझोल्लाचे ‘कल्चर’ सोडण्यात आले. गोठ्याशेजारीच हे तळे उभारल्याने शेतकऱ्यांना दररोज ताजे अझोल्ला जनावरांना देणे सोयीचे ठरणार आहे.

अझोल्लाचे महत्त्व व फायदे:

खाद्य खर्चात बचत: अझोल्लाच्या वापरामुळे पारंपरिक पशुखाद्यावरील खर्चात २० ते २५ टक्के बचत होते.

दुधात वाढ: नियमित सेवनाने दूध उत्पादनात १० ते १५ टक्क्यांपर्यंत वाढ दिसून येते.

पोषक घटक: अझोल्लामध्ये प्रथिने, खनिजे आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात.

खत म्हणून वापर: याचा उपयोग शेतीत जैवखत आणि हिरवळीचे खत म्हणूनही करता येतो.

पाणी व तळे व्यवस्थापन:

प्रात्यक्षिकात पाणी व्यवस्थापनाचे महत्त्व विशद करण्यात आले. अझोल्लाच्या पहिल्या कापणीनंतर तळ्यातील २० ते ३० टक्के पाणी बदलावे. तसेच दर ३ ते ४ कापण्यांनंतर संपूर्ण पाणी बदलून नव्याने स्लरी टाकावी, जेणेकरून अझोल्लाची गुणवत्ता व वाढ उत्तम राहते.

हे प्रात्यक्षिक डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुंकरकर, RAWE समन्वयक डॉ. अशोक चव्हाण, केंद्र प्रभारी डॉ. विजय देसाई, विषय तज्ज्ञ डॉ. नरेंद्र प्रसादे आणि कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष शिगवण व डॉ. प्रवीण झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या प्रसंगी गावातील ११ शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. कमी खर्चात पौष्टिक पशुखाद्य तयार करण्याची सोपी पद्धत शिकायला मिळाल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button