कोकेडामाची जादू अन् नारळाचा गोडवा! सोवेलीच्या जि. प. शाळेत ‘मृद्गंध’ ग्रुपचा भन्नाट उपक्रम

सोवेली दि. ३ सप्टेंबर (सागर गोवळे) :- मातीचा सुवास, निसर्गाची आवड आणि विद्यार्थ्यांचा उत्साह… याचंच एक सुंदर रूप दापोली तालुक्यातील सोवेली गावात पाहायला मिळालं! डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील कृषि महाविद्यालयाच्या ‘मृद्गंध’ ग्रुपच्या विद्यार्थिनींनी ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत जि. प. शाळा सोवेली क्र. १ मध्ये एक आगळावेगळा आणि ‘झक्कास’ उपक्रम राबवून संपूर्ण गाव जिंकून घेतलं.

जपानी ‘कोकेडामा’ कलेने मुलं झाली मंत्रमुग्ध!
३१ ऑगस्ट रोजी कुंडीशिवाय झाडं फुलवण्याच्या जपानी ‘कोकेडामा’ कलेवर खास कार्यशाळा रंगली. कु. मयुरी मिसळ यांच्या मार्गदर्शनाखाली शाळकरी विद्यार्थ्यांनी कोकोपीट, गांडूळ खत आणि नारळाच्या काथ्याचा (Coir) वापर करून स्वतःच्या हाताने कोकेडामा तयार केले. धाग्याने मातीचा गोळा बांधताना विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. या प्रात्यक्षिकातून मुलांना संघकार्य आणि रोपवाटिका व्यवस्थापनाचे धडे मिळाले.
मोदक, पातोळ्या अन् नारळ वडी… जागतिक नारळ दिनाला खाद्यसंस्कृतीची पर्वणी!
२ सप्टेंबर रोजी ‘जागतिक नारळ दिन’ मोठ्या थाटामाटात साजरा झाला. यावेळी नारळापासून बनवलेले पारंपारिक आणि आधुनिक पदार्थ पाहून उपस्थितांच्या तोंडाला पाणी सुटले. मोदक, पातोळ्या, खीर, चिक्की, नारळ वडी यासोबतच चॉकलेट, आंबा अन् वेलची फ्लेवरचे खमंग नारळ लाडू बनवून सर्वांना वाटण्यात आले.
तसेच, कु. पूर्वा कुरूळकर हिने ‘लखी बाग’ मॉडेल आणि नारळाच्या विविध प्रजातींविषयी (गंगा बोंडम, प्रताप, ग्रीन/ऑरेंज/यलो ड्वार्फ, बाणावली इ.) अत्यंत सोप्या भाषेत माहिती दिली. आदल्या दिवशी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या कोकेडामाचे प्रदर्शनही या वेळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
ग्रामस्थ अन् मान्यवरांकडून कौतुकाचा वर्षाव!
या कार्यक्रमाला सोवेलीचे सरपंच श्री. जयेश मानकर, शाळेच्या मुख्याध्यापिका, चव्हाणवाडीतील २५ ते ३० ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. “कृषी शाखेच्या या विद्यार्थिनींनी मुलांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण करून अप्रतिम कार्य केले आहे,” अशा शब्दांत सरपंच व मुख्याध्यापकांनी ‘मृद्गंध’ ग्रुपची पाठ थोपटली.
सदर यशस्वी उपक्रम सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुणकेरकर, रावे समन्वयक डॉ. अशोक चव्हाण, केंद्र प्रमुख डॉ. विजयकुमार देसाई, तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष शिगवण व डॉ. प्रवीण झगडे यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
विद्यार्थ्यांच्या या नावीन्यपूर्ण आणि उत्साही उपक्रमाचे संपूर्ण परिसरातून जोरदार कौतुक होत आहे!



