रत्नागिरी

देवरुखच्या सृजन विज्ञान केंद्रातील अवकाश शास्त्र आणि तंत्रज्ञान संग्रहालयाचे उद्घाटन

देवरुख दि. २ सप्टेंबर ( प्रतिनिधी ):- कोकणातील एकमेव असलेल्या देवरुख येथील सृजन विज्ञान केंद्रात अद्ययावत असे अवकाश शास्त्र आणि तंत्रज्ञान संग्रहालय उभारण्यात आले आहे. या संग्रहालयाचे उद्घाटन सोमवार, दिनांक ७ सप्टेंबर रोजी संगमेश्वर-चिपळूण मतदार संघाचे आमदार मा. श्री. शेखरजी निकम यांच्या हस्ते आणि गणपतीपुळे देवस्थान मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. निलेशजी कोल्हटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात अगदी मोजक्याच ठिकाणी अवकाश शास्त्र संग्रहालय असून, देवरुख येथे असे संग्रहालय उभारले जात आहे ही अभिमानाची गोष्ट आहे. या संग्रहालयामध्ये भारतीय अवकाश शास्त्राचा इतिहास दाखवणारी एक्झिबिट्स, तसेच इस्रोने विकसित केलेली क्रायोजेनिक इंजिन, विकास इंजिन, विक्रम लँडर, मंगळयान, गगनयान, पी एस एल व्ही, एस एस एल व्ही आदी मॉडेल्स व त्यांची माहिती प्रदर्शित केलेली असून जागतिक पातळीवरील अपोलो-११ मून लँडर, चॅलेंजर स्पेस शटल, क्युरिऑसिटी मार्स रोव्हर, तसेच आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्र अशा एक्झिबिट्सचा समावेश आहे. त्याचप्रमाणे विश्वाची व्याप्ती दर्शवणारी भव्य पॅनल्स आहेत. याचबरोबर ६ इंच व्यासाची, संगणकावर प्रतिमा देणारी स्वयंचलित सेलेस्ट्रॉन दुर्बीण हे देखील या संग्रहालयाचे मुख्य आकर्षण आहे.

सुमारे ३६ लाख रुपये खर्चून उभारलेल्या या अवकाश तंत्रज्ञान संग्रहालयाचा लाभ विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन सृजन विज्ञान केंद्राचे संस्थापक आणि देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत आणि विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. चंद्रशेखर केदारी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button