रत्नागिरी

कोणाची गय न करता रत्नागिरी शहरातील अतिक्रमणे हटविणार : नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे

रत्नागिरी दि. २६ ऑगस्ट :-  शहरातील पदपथ हे नागरिकांना सुरक्षितपणे चालण्यासाठी असून रस्ते वाहनांसाठी आहेत. त्यामुळे पदपथांसह सार्वजनिक ठिकाणी झालेली सर्व प्रकारची अतिक्रमणे हटविण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. संपूर्ण शहरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येणार असून, यामध्ये कोणाचीही गय केली जाणार नाही. अतिक्रमण करणाऱ्यांवर आवश्यकतेनुसार कायदेशीर कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत दिल्या.

रत्नागिरी नगर परिषदेची सर्वसाधारण सभा मंगळवारी (२५ ऑगस्ट) नूतन इमारतीतील सभागृहात पार पडली. या सभेत शहरातील अतिक्रमणांचा मुद्दा सर्वाधिक चर्चेचा ठरला. नगर परिषदेतर्फे शहरातील टपऱ्या व अनधिकृत दुकाने हटविण्याची मोहीम यापूर्वीच सुरू करण्यात आली असून, या कारवाईचे तीव्र पडसाद सभेत उमटले.

अतिक्रमण हटाव कारवाईबाबत नगरसेवकांमध्ये उलटसुलट मते व्यक्त करण्यात आली. काही सदस्यांनी ठराविक भागांमध्येच करण्यात येणाऱ्या कारवाईला विरोध दर्शवित, संपूर्ण शहरातील सर्व प्रकारची अतिक्रमणे हटविण्याची मागणी लावून धरली. यावर नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी स्पष्ट भूमिका मांडत शहरातील अतिक्रमणांवर कोणताही भेदभाव न करता कारवाई केली जाईल, असे सांगितले.

दरम्यान, सभेत शहराच्या विकासाशी संबंधित अनेक विषयांवर चर्चा करून त्यांना मंजुरी देण्यात आली. नागरी बेघर निवारा देखभालीसाठी निधी मिळविणे, झोपडपट्टीधारकांचे सर्वेक्षण करून त्यांच्या पुनर्वसनासाठी डीपीआर तयार करणे तसेच नगर परिषदेच्या विविध विभागांतील कामांना मुदतवाढ देणे, या विषयांना मंजुरी देण्यात आली. तसेच शहरातील विविध विकासकामांच्या अंदाजपत्रकांना मंजुरी देण्यात आली असून, नवीन विकासकामांसाठी निविदा मागविण्याचाही निर्णय घेण्यात आला.

गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने शहरातील रस्त्यांच्या स्थितीबाबतही सभेत सूचना करण्यात आल्या. महानगर गॅस कंपनीच्या प्रतिनिधींनी तूर्तास शहरात कुठेही नवीन खोदकाम करू नये, अशा सूचना नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी दिल्या. तसेच यापूर्वी ज्या ठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे, तेथील खड्डे तातडीने बुजवावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

खोदकामामुळे शहरातील विविध ठिकाणी साचलेले मातीचे ढिगारे तातडीने उचलून रस्त्यांची स्वच्छता करण्यात यावी, अशा सूचनाही नगराध्यक्षा सुर्वे यांनी संबंधितांना दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button