मालगुंड प्रशाला आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये कायदेविषयक जनजागृती प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

तरवळ दि. २३ ऑगस्ट (अमित जाधव) :- जिल्हाधिकारी व रत्नागिरी जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय यांच्या मार्गदर्शनाखाली ऑक्सिलियम एम्पॉवरमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेच्या माध्यमातून रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनिअर कॉलेज मालगुंड येथे (पॉश)posh व (पोस्को)pocso या कायद्याविषयी जनजागृती व प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर संस्था रत्नागिरी जिल्ह्यातील १० पेक्षा जास्त कर्मचारी असणाऱ्या संस्था व आस्थापनांमध्ये जाऊन तिथल्या कर्मचारी तसेच शाळांमधील विद्यार्थ्यांशी विशेषकरून महिलांसोबत संवाद साधून (पॉश )posh आणि (पोस्को)posco या कायद्याविषयी जनजागृती करणे तसेच कर्मचारी व विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे, तसेच कायदेशीर सल्ला त्याच बरोबर वार्षिक अहवाल मार्गदर्शन व सेवा देण्याचे अतिशय महत्त्वाचे काम करीत आहे. या उपक्रमांतर्गत महिला व मुलींचा कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ याला प्रतिबंध घालण्यासाठी शासनाच्या वतीने (पॉश )posh कायदा आणला आहे. तसेच बालहक्क, बालविवाह प्रतिबंध, बालकामगार निर्मूलन आणि बालकांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण करण्यासाठी posco (पोस्को) हा महत्त्वाचा कायदा अमलात आणला आहे. या दोन्ही विषयांवर मार्गदर्शन आणि जनजागृती करण्यासाठी आणि प्रशिक्षण देण्यासाठी ही संस्था जिल्ह्यातील विविध आस्थापनांमध्ये व शाळांमध्ये जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांना तसेच शिक्षक व कर्मचारी यांना मार्गदर्शन व कायदेविषयक जनजागृतीचे आपले प्रभावी काम करीत आहे.
या कार्यशाळेच्या माध्यमातून शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी सुरक्षितता व स्वसंरक्षण, तसेच सुरक्षित, असुरक्षित आणि गोंधळात टाकणारा स्पर्श good touch, bad touch या विषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. व्हिडिओ दृश्यांच्या माध्यमातून कशा प्रकारे ओळखीतलेच लोक कशा प्रकारे विद्यार्थ्यांशी लगट करतात व लहान मुलांचे लैंगिक शोषण करतात त्या विषयी सविस्तर माहिती व्हिडिओ दृश्यांच्या माध्यमातून दिली. जर एखाद्या वेळी तुमच्या सोबत अशा प्रकारची घटना घडली तर तुम्ही लगेचच आपल्या जवळच्या नातेवाईकांना जाऊन सांगावे आणि सदर व्यक्तीची पोलिस ठाण्यात जाऊन रीतसर तक्रार दाखल करावी. सदर व्यक्तीवर (पोस्को)posco या कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल होउन कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच (पोस्को)posco या कायद्याविषयी जनजागृती झाली पाहिजे तसेच या कायद्याची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली.
सदर कार्यक्रमामध्ये पॉश (posh) या कायद्याविषयीची माहिती करून दिली. तसेच या कायद्यामध्ये अंतर्गत व बाह्य समिती कशा पद्धतीने कार्य करते हे देखील सांगितले. त्याच बरोबर प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला. तसेच प्रात्यक्षिके सादर करून विद्यार्थ्यांना कायदा कसा कार्य करतो हे दाखवून दिले. याच कार्यक्रमात शिक्षकांशी सुद्धा संवाद साधला गेला.
सदर कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून तसेच कायदा आणि कायदेविषयक जनजागृती करण्यासाठी या संस्थेच्या जिल्हा समन्वयक रसिका आयरे यांनी अतिशय चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांशी संवाद साधत माहिती दिली. तसेच त्यांच्या बरोबर या संस्थेचे प्रशिक्षक सिद्धेश लाड व सामाजिक कार्यकर्ते अजय सावंत हे देखील उपस्थित होते.



