हत्तीरोग शोध मोहिमेत नागरिकांनी तपासणी करून घेण्याचे आवाहन

रत्नागिरी, दि. २१ ऑगस्ट : हत्तीरोगाचे वेळेत निदान होऊन बाधित रुग्णांना आवश्यक उपचार व आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव “अभियानांतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली दि. १६ ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत हत्तीरोग शोध मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान नागरिकांची तपासणी करून हत्तीरोगाचे संशयित व बाधित रुग्ण शोधण्यात येत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात सन २०२६ मध्ये आतापर्यंत १०,४४४ रक्त नमुने संकलित करण्यात आले असून, त्यापैकी १०,३७४ नमुन्यांची तपासणी पूर्ण झाली आहे. यामध्ये ८३ नमुने हत्तीरोगासाठी पॉझिटिव्ह आढळले असून जिल्ह्याची पॉझिटिव्हिटी ०.८० टक्के आहे. ही माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष यादव यांनी दिली.
तालुकानिहाय तपासणीची स्थिती
तालुकानिहाय आकडेवारीनुसार मंडणगड येथे १९५ नमुने तपासण्यात आले असून ४ नमुने पॉझिटिव्ह आढळले. दापोली येथे १,६८२ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून २५ पॉझिटिव्ह आढळले. खेड येथे १,७६० नमुन्यांपैकी १२ पॉझिटिव्ह, गुहागर येथे ६०९ नमुन्यांपैकी ६ पॉझिटिव्ह, तर चिपळूण येथे १,३५२ नमुन्यांपैकी २२ पॉझिटिव्ह आढळले आहेत.
संगमेश्वर येथे ५४५ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून एकही पॉझिटिव्ह नमुना आढळलेला नाही. रत्नागिरी येथे २,८९३ नमुन्यांपैकी ८ पॉझिटिव्ह, लांजा येथे ६४७ नमुन्यांपैकी ६ पॉझिटिव्ह आढळले आहेत. राजापूर येथे ६९१ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून एकही पॉझिटिव्ह नमुना आढळलेला नाही.
वेळेत तपासणी करणे महत्त्वाचे
हत्तीरोग हा दुर्लक्षित आजार असून त्याचे वेळेत निदान होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मोहिमेदरम्यान आरोग्य विभागामार्फत नागरिकांची तपासणी तसेच हत्तीरोग व अंडवृद्धी (हायड्रोसिल) संबंधित रुग्णांचा शोध घेण्यात येत आहे. पूर्वी हत्तीरोगाचे निदान झालेले रुग्ण, उपचार घेत असलेले रुग्ण तसेच हत्तीरोगाची लक्षणे आढळणाऱ्या नागरिकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक माहिती देऊन तपासणी करून घ्यावी.
आरोग्य विभागाच्या पथकांकडून करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणास नागरिकांनी सहकार्य करावे. हत्तीरोगाबाबत कोणतीही लक्षणे किंवा संशय असल्यास ते लपवू नये. वेळेत तपासणी, निदान आणि उपचारामुळे हत्तीरोगाच्या गुंतागुंतीपासून बचाव करणे शक्य आहे.
जिल्हा प्रशासनाचे आवाहन
हत्तीरोग शोध मोहिमेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आपल्या परिसरातील नागरिकांनी तपासणी करून घ्यावी तसेच आरोग्य विभागाच्या पथकांना आवश्यक माहिती व सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती अस्मिता केंद्रे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. विलास चाळके, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.
“हत्तीरोग लपवू नका—तपासणी करून घ्या; हत्तीरोगमुक्त रत्नागिरीसाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा आहे,” असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती अस्मिता केंद्रे यांनी केले.
दि. ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत सुरू असलेल्या या मोहिमेत नागरिकांनी आरोग्य विभागाच्या पथकांना सहकार्य करून हत्तीरोगमुक्त रत्नागिरीच्या संकल्पनेला बळ द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
-( डॉ. अनिरुद्ध आठल्ये ), जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी



