रत्नागिरी

कोतवडे जिल्हा परिषद गटाच्या प्रभाग समितीची मालगुंड येथे पहिली सभा; विविध शासकीय योजनांची माहिती!

गणपतीपुळे दि. १६ जुलै (वैभव पवार) :- कोतवडे जिल्हा परिषद गटाच्या प्रभाग समितीची पहिली सभा बुधवारी मालगुंड ग्रामपंचायतीच्या कवीवर्य केशवसुत सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य राजेश उर्फ राजू साळवी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांनी शासनाच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती उपस्थित सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांना दिली. याचबरोबर नागरिकांच्या विविध अडीअडचणी, प्रलंबित कामे आणि स्थानिक समस्यांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली.

सभेच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी समितीचे अध्यक्ष राजेश साळवी, उपाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य स्वप्निल मयेकर, पंचायत समिती सदस्या पूर्वा दुर्गवळी, मालगुंडच्या सरपंच श्वेता खेऊर, उपसरपंच स्मिता दुर्गवळी, रत्नागिरी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी पी. एन. सुर्वे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यानंतर उपस्थित सर्व मान्यवर, अधिकारी आणि ग्रामपंचायतींच्या प्रतिनिधींचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

प्रलंबित कामांचा आढावा

सभेत अध्यक्ष राजेश साळवी यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांकडून त्यांच्या विभागातील कामांचा आढावा घेतला. कोतवडे जिल्हा परिषद गटातील नऊ ग्रामपंचायतींमध्ये प्रलंबित असलेल्या विविध विकासकामांची माहिती घेत संबंधित अधिकाऱ्यांना ती तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

ग्रामस्थांना भेडसावणाऱ्या मूलभूत समस्या, विकासकामांतील अडथळे आणि शासकीय योजनांच्या अंमलबजावणीतील त्रुटी यावरही सविस्तर चर्चा झाली.

बेजबाबदार अधिकाऱ्यांना उपाध्यक्षांचा इशारा

बैठकीदरम्यान काही विभागांकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने समितीचे उपाध्यक्ष स्वप्निल मयेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. प्रत्येक अधिकाऱ्याने जबाबदारीची जाणीव ठेवून नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करावीत आणि टाळाटाळ करू नये, असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सुनावले.

महावितरण आणि बांधकाम विभागावर सरपंचांची नाराजी

सभेत सर्वाधिक चर्चा महावितरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावर झाली. उपस्थित सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी या दोन्ही विभागांच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. नागरिकांना वेळेवर माहिती न देणे, समस्यांकडे दुर्लक्ष करणे आणि बेजबाबदार उत्तरे देणे, अशा तक्रारी यावेळी मांडण्यात आल्या. यावर अध्यक्ष राजेश साळवी आणि उपाध्यक्ष स्वप्निल मयेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नागरिकांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्या तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या.

विविध विभागांकडून योजनांची माहिती

बैठकीत आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, एकात्मिक बाल विकास विभाग, पंचायत समिती, तालुका कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, उमेद अभियान तसेच इतर विभागांच्या अधिकाऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. नागरिकांना उपलब्ध सुविधा, लाभ घेण्याची प्रक्रिया आणि विभागीय कामकाजाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थितांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची समाधानकारक उत्तरेही अधिकाऱ्यांनी दिली.

स्मार्ट मीटरवर सविस्तर मार्गदर्शन

महावितरणच्या स्मार्ट मीटर योजनेबाबत उपस्थितांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. यावेळी स्मार्ट मीटर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या योजनेची कार्यपद्धती, फायदे आणि नागरिकांच्या शंकांचे सविस्तर निरसन केले.

भगवती नगर ग्रामपंचायतीतील कर्मचाऱ्याच्या पगाराचा मुद्दा चर्चेत

सभेदरम्यान भगवती नगर ग्रामपंचायतीतील एका कर्मचाऱ्याच्या रखडलेल्या पगाराचा प्रश्न उपस्थित झाला. या विषयावर उपाध्यक्ष स्वप्निल मयेकर यांनी संबंधित ग्रामसेवकाला जाब विचारत कर्मचाऱ्याचा पगार तातडीने अदा करण्याच्या सूचना दिल्या. तसेच सरपंच आणि ग्रामसेवकांनी हा प्रश्न त्वरित निकाली काढावा, असे निर्देश देण्यात आले.

ग्रामस्थांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा

सभेच्या समारोपावेळी अध्यक्ष राजेश साळवी यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी उपस्थितांना योजनांची माहिती दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. सर्व विभागांनी नागरिकांची प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करावीत आणि लोकाभिमुख प्रशासनाची भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. प्रभाग समितीच्या माध्यमातून कोतवडे जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावातील विकासकामे आणि नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

सभेचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन विस्तार अधिकारी पी. एन. सुर्वे यांनी केले. या बैठकीस विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, कोतवडे जिल्हा परिषद गटातील नऊ ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button