रत्नागिरी

धामणसे हटवाडीतील “स्विमिंग पिकनिक पॉईंट” ठरतोय पर्यटकांचे आकर्षण

गणपतीपुळे दि. १८ ऑगस्ट (वैभव पवार) :- जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असलेल्या गणपतीपुळेपासून अवघ्या दहा ते बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या धामणसे गावातील हटवाडी सोमनदीवरील स्विमिंग पिकनिक पॉईंट सध्या पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. या स्विमिंग पिकनिक पॉईंटच्या ठिकाणी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून राष्ट्रध्वजाच्या तीन रंगांची उधळण करण्यात आली. या नदीतील तीन अर्धवर्तुळकार बंधाऱ्यांवर विद्युत रोषणाईच्याद्वारे तिरंग्याचे कलर सोडून करण्यात आलेले तिरंगा प्रतिरूप पाहून अनेक पर्यटक भारावले. तसेच स्थानिकांमध्ये देखील तिरंग्याच्या या नेत्रदीपक आणि अतिशय मनमोहक नजाऱ्याची विशेष आकर्षणता निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.

भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून धामणसे ग्रामपंचायतीने पर्यटकांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने नदीतील तीन अर्धवर्तुळाकार बंधाऱ्यांवर नदीवर बांधण्यात आलेल्या पुलावरून विद्युत रोषणाईद्वारे तिरंग्यातील तीन रंगांचे प्रतिबिंब तयार करून पर्यटकांना एक वेगळा नजराणा पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली .तसेच तिरंग्याचे प्रतिरूप सलग तीन दिवस पाहता यावे यासाठी दिनांक 14 ते 17 तारखेपर्यंत ते खुले ठेवण्यात आले.

या तीन दिवसीय कालावधीत संध्याकाळ ते रात्री दहा वाजेपर्यंत नदीतील तीन अर्धवर्तुळाकार बंधाऱ्यांवर पडणाऱ्या पाण्यावर तयार करण्यात आलेले तिरंग्याचे नयनरम्य दृश्य पर्यटकांना पाहण्याची संधी उपलब्ध झाली. मात्र यावेळी नदीमध्ये पोहण्यासाठी पर्यटकांना प्रतिबंध करण्यात आल्याची माहिती धामणसे ग्रामपंचातीकडून देण्यात आली.परंतु पर्यटकांनी येथील सुंदर सौंदर्य आणि नेत्रदीपक नजराणा आपल्या मोबाईल आणि कॅमेरा मध्ये टिपण्याची संधी घेतली. धामणसे हटवाडी येथे ओरीतून धामणसेकडे येणाऱ्या या मोठ्या नदीवरील पुलासाठी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून सुमारे तीन कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या पुलाचे काम मार्गी लागले. त्यानंतर पुलावर असलेल्या नदीमध्ये तीन अर्धवर्तुळाकार बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली.

त्यामध्ये नदीतील पाणी बंधाऱ्यांमध्ये पडत असल्याने अतिशय पांढरे शुभ रंगाचे फेसाळणारे पाणी पर्यटकांचे खास आकर्षण ठरते. त्यामुळे नदीत पोहण्यासाठी आणि त्यानंतर अर्धवर्तुळाकार बंधाऱ्यातील फेसाळणाऱ्या पाण्याचा मनमुराद आनंद पर्यटकांना घेता येतो. तसेच अनेक पर्यटक बंधाऱ्यातील फेसाळणाऱ्या पाण्याचे अविस्मरणीय क्षण मोबाईलमध्ये टिपताना दिसून येते.या नदीच्या आजूबाजूला शेतीचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे. ही नदी खोल नाही .तसेच पाण्याचा प्रवाह देखील सध्या कमी आहे . तसेच आजूबाजूचे अतिशय शांत सौंदर्य पर्यटकांना न्याहाळता येते.

पावसाळ्यातील अतिसुंदर असा हा परिसर पाहण्यासारखा आहे. हटवाडी हा दुर्गम भाग असला तरी धामणसे हा अतिशय शांत, संयमी आणि सुसंस्कृत गाव आहे. या नदी परिसराच्या विकासासाठी आमदार भैया सामंत यांनी विशेष महत्त्वाच्या सूचना केल्या असून पुढील वर्षी येथील संपूर्ण परिसर सुशोभिकरणासहित पर्यटकांना खुला होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या आकर्षण असलेल्या स्विमिंग पिकनिक पॉईंटची माहिती अनेक रिल स्टार आणि सोशल मीडियावर काम करणाऱ्या व्यक्तीं आणि विविध माध्यमांनी सर्वदूर पोहचवली आहे.

त्यामुळे अनेक ठिकाणचे नागरिक व पर्यटक या भागाकडे वळू लागले आहेत. पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे येथील स्थानिक बचत गट महिलांना आर्थिक रोजगाराची संधी उपलब्ध झाली असून विविध खाद्यपदार्थ आणि खास कोकणी खाद्य पदार्थांची चव पर्यटकांना बचतगटांच्या स्टॉलवर चाखायला मिळत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने रोजगार निर्मिती या ठिकाणी होऊ लागली आहे. एकूणच धामणसे हटवाडी पुलावर असलेल्या तीन अर्धवर्तुळकार बंधाऱ्यांच्या कामामुळे येथील पर्यटनाला खऱ्या अर्थाने चालला मिळू लागली असून धामणसे गाव आता पर्यटनाच्या दृष्टीने अधिक विकसित होणार असल्याचे मत व्यक्त होऊ लागले आहे. तसेच जगाच्या नकाशावर अर्धवर्तुळाकार बंधाऱ्यांच्या नयनरम्य दृश्याची प्रसिद्धी होऊ लागली आहे.

या गावासाठी रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून नदीतील गाळ काढण्यासाठी निधी प्राप्त झाला. त्यामुळे नदीतील गाळ अतिशय योग्य प्रकारे काढला गेल्याने नदीतील पाण्याचा प्रवाह हा सुरळीत झाल्याचे देखील सांगण्यात आले आहे. त्यामुळे पालकमंत्री सामंत यांचे योगदान देखील या बंधाऱ्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले आहे. येथील नदीमध्ये पोहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांनी निसर्गाचा आणि पोहण्याचा आनंद घेताना कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही तसेच मद्यपान होणार नाही. शिवाय प्लास्टिकचा कचरा होणार नाही आणि कोणतीही दुर्घटना घडणार नाही याची काळजी पर्यटकांनी घ्यावी तसेच धामणसे ग्रामपंचायतीला सहकार्य करावे असे आवाहन धामणसेचे सरपंच अमर रहाटे यांनी केले आहे.

या बंधाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी वाढू लागल्याने धामणसे ग्रामपंचायतीने विशेष उपाययोजना हाती घेऊन खास सूचनाफलक नदी परिसरात लावले आहेत. तसेच हटवाडीकडे जाणाऱ्या मुख्यमार्गावरच वाहनांची तपासणी आणि विशेष नोंदणी करून पर्यटकांना हटवाडी नदीकडे सोडले जात आहे .शिवाय शनिवार आणि रविवारची मोठी गर्दी लक्षात घेऊन धामणसे ग्रामपंचायतीकडून ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी मागवले जात आहेत.

त्यामुळे ग्रामीण पोलीस ठाण्याचे पुरूष व महिला पोलीस कर्मचारी या ठिकाणी बंदोबस्त बजावत असून पर्यटकांना विशेष सूचना देऊन गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे काम करीत असल्याचे चित्र दिसून आले आहे. एकूणच धामणसेचे सरपंच अमर रहाटे यांनी अतिशय नियोजनात्मक आखणी करून हटवाडी स्विमिंग पिकनिक पॉईंट अधिक आकर्षित आणि विकसित करण्यासाठी नवे प्रयत्न सुरू केले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button