
गणपतीपुळे दि. १८ ऑगस्ट (वैभव पवार) :- रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील स्वयंभू श्रींच्या मंदिरात पवित्र श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी गणपती एक्का उत्सव मोठ्या भक्तीभावात व उत्साहात साजरा करण्यात आला.
या दिवशी गणपतीपुळे परिसरातील विविध भजनी मंडळांनी सहभाग घेऊन हरिनामाचा गजर करीत संपूर्ण मंदिर परिसर भक्तीमय भक्तिमय केला. प्रतिवर्षाप्रमाणे स्वयंभू श्रींच्या मंदिरात होणाऱ्या या गणपती एक्का उत्सवात गणपतीपुळे परिसरातील विविध भजनी मंडळे सहभागी झाले होते.
या भजनी मंडळांकडून श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी सकाळी नऊ ते मंगळवारी दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजेपर्यंत म्हणजेच एकूण 24 तासांच्या कालावधीत हरिनामाचा गजर केला जाणार आहे. गणपतीपुळे मंदिरातील या गणपती एक्का उत्सवात गणपतीपुळे येथील केदारवाडी ,मानेवाडी तर भंडारपुळे येथील धनजी समाज, बापूजी समाज, वीरवाडी, पाटील समाज तसेच धामणसे येथील रहाटेवाडी व नेवरे येथील लावगणवाडी इत्यादी भजनी मंडळे सहभागी झाले आहेत.
या भजनी मंडळाकडून हरी नामाचा गजर केला जात आहे. आज सोमवारी सकाळपासून सुरू झालेला हा एक्का उत्सव मंगळवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत चालणार असल्याची माहिती देवस्थान समितीकडून देण्यात आली .
दरवर्षी पवित्र श्रावण महिना हा विविध व्रत वैकल्ले व देवाचे स्मरण करण्याचा मानला जातो. या महिन्यात अनेक ठिकाणच्या मंदिरांमधून हरिनामाचा गजर केला जातो. त्याप्रमाणे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील स्वयंभू श्रींच्या मंदिरात देखील प्रति वर्षाप्रमाणे हा एक्का उत्सव साजरा केला जातो. या एक्का उत्सवात श्रींच्या दर्शनासाठी आलेले भाविक व पर्यटक मोठ्या संख्येने भक्तीभावाने सहभागी होतात. त्यामुळे एक भक्तिमय वातावरण मंदिर परिसरात निर्माण होते. तसेच भाविक व पर्यटकांना खऱ्या भक्तीचा अनुभव या ठिकाणी घेता येतो.
त्यामुळे गणपतीपुळे येथील एक्का उत्सव हा प्रतिवर्षी भाविक व पर्यटकांसाठी खास उत्सुकतेचा मानला जातो. या एक्का उत्सवासाठी प्रति वर्षाप्रमाणे गणपतीपुळे परिसरातील भजनी मंडळे सहभागी होत असल्याने गणपतीपुळे देवस्थान समितीकडून सर्वच भजनी मंडळांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले आहेत.



