साखरप्यात कै. नानासाहेब शेट्ये यांच्या ३३ व्या स्मृतिदिनानिमित्त पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

संगमेश्वर दि. २ ऑगस्ट ( प्रतिनिधी ):- साखरपा येथील लोकप्रिय समाजसेवक, लोकनेते व सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात कायम सहभागी राहिलेले कै. नानासाहेब शेट्ये यांच्या ३३ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण व भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाला लांजा-राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कै. नानासाहेब शेट्ये यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दोन मिनिटे मौन पाळून त्यांच्या कार्याला आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी आमदार किरण सामंत यांनी आपल्या मनोगतात कै. नानासाहेब शेट्ये यांच्या समाजकार्यातील योगदानाचा गौरव करताना सांगितले की, “समाजासाठी निःस्वार्थ भावनेने काम करणारी माणसे कधीच काळाच्या पडद्याआड जात नाहीत. त्यांचे विचार, त्यांचे कार्य आणि त्यांनी निर्माण केलेले संस्कार समाजाला सतत प्रेरणा देत राहतात. कै. नानासाहेब शेट्ये यांनी साखरपा परिसरात समाजहिताची जी परंपरा निर्माण केली, ती आजही अनेकांसाठी मार्गदर्शक आहे.”राणी लक्ष्मीबाई यांचा मूळ गाव लांजा तालुक्यातील कोट असून या गावात त्यांचा स्मारक होण्यासाठी सत्कार मूर्ती शांताराम सुर्वे यांनी केलेल्या मागणीला पुष्टी देत हे स्मारक उभारण्यासाठी आपण निधी उत्पन्न करून देणार आहोत असेही आमदार भैय्या सामंत यांनी म्हटले.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर, समाजसेवक, शिक्षक, आरोग्य कर्मचारी, शेतकरी, उद्योजक, युवक तसेच सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा ‘कै. नानासाहेब शेट्ये स्मृती पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि प्रशस्तीपत्र देऊन पुरस्कारार्थींचा सत्कार करण्यात आला.
उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात कै. नानासाहेब शेट्ये यांच्या साधेपणाचा, सेवाभावी वृत्तीचा, लोकांप्रती असलेल्या आत्मीयतेचा आणि समाज विकासासाठी केलेल्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी आयोजित करण्यात येणारा हा पुरस्कार सोहळा समाजातील सकारात्मक कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देणारा उपक्रम असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, शिक्षक, महिला, युवक तसेच साखरपा व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी कै. नानासाहेब शेट्ये यांच्या कार्याच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या समाजसेवेचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापू शेट्ये यांनी केले.यावेळी त्यांनी आमदार भैया सामंत यांच्याकडे जाताना कोणालाही मध्यस्थीची गरज लागत नाही असे म्हणून आमदार राजन साळवी यांच्या वेळी साखरपा परिसरातील जनतेला कायम जया माने यांच्याच पत्राची गरज असायची असे आवर्जून सांगितले. आयोजकांनी उपस्थितांचे आभार मानले.
कै. नानासाहेब शेट्ये यांच्या स्मृती चिरंतन ठेवत समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव करण्याची परंपरा पुढेही कायम ठेवण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विलास चाळके जिल्हा नियोजन समितीचे सदस्य बापू शेट्ये ,उद्योजक विष्णू रामाने, युयुस्तु आर्तें,दत्ताराम शिंदे संतोष केसरकर, गणपत शिर्के, राजू कुरूप, बाबा भिंगारडे, राजेश पत्त्यानी, संजय गांधी, आबा सावंत, नेत्रा शिंदे, राजेश कामेरकर,संजय कांबळे, मारुती शिंदे, विलास बेर्डे जया माने, रजनी चिंगळे, रमाकांत शेट्ये रमाकांत सुर्वे, विलास सुकम अंकुश सुर्वे, प्रसाद अपंडकर यांच्यासह सर्व सत्कारमूर्ती संस्थेचे सर्व पदाधिकारी ग्रामस्थ महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.



