रत्नागिरी

स्पंदन!

 सुहास वाडेकर, हर्चे, लांजा 

आमचं हर्चे तालुका अथवा जिल्हा, दोन्हीपासून सुमारे बेचाळीस किमीवर. सध्या रस्ता डांबरी झाल्यामुळे जरा हायसे वाटते ; पण पंधरा वीस वर्षांपूर्वीची स्थिती अंगावर काटे आणणारी. तरीही तब्बल पंचावन्न वर्षे आपली सेवा अविरत बजावणारे पंचक्रोशीचे देवदूत डॉ. कलवारी या अजब रसायनाचे नेहमीच अप्रूप वाटते. मुंबईसारख्या शहरात दवाखाना न उघडता कसलीच सोय, सुविधा नसलेल्या आपल्या स्वतःच्या गावाची प्रॅक्टिसकरिता निवड करण्याऱ्या या प्रतिभासंपन्न निष्णात डॉक्टरांचे नुकतेच प्रकाशित झालेले तिसरे पुस्तक स्पंदन हाती पडले आणि पुन्हा एकदा संवेदनशील मनाचे दर्शन घडले.

खरं तर कोरोना काळात उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करताना आलेल्या अडचणींचा आणि डॉक्टरांच्या प्रदीर्घ अनुभवाचा हा संघर्ष आहे, असे वरवर जरी वाटत असले तरी मानवी मूल्याचा आणि शहर – गाव यातील सुखाचा शोध घेण्याचा तो खजिना आहे. सध्याचा लांबलेला पाऊस पाहता ‘ आपण निसर्गाशी, पर्यावरणाशी खूपच वाईट वागलो आहोत, त्याचा नाश केला आहे. त्याच्या कामात ढवळाढवळ करुन सुधारणेच्या नावाखाली निसर्गमातेला त्रास दिला आहे. त्यामुळेच पर्यावरणाचा तोल ढासळला,’ हे अगदी तंतोतंत पटते आहे.

वयाची ऐंशी वर्षे पार करूनही आजही नित्यक्रमापासून तसूभर न हलणारे डॉक्टर, त्यांची मनाची तयारी आणि कितीही प्रतिकूल परिस्थिती असली, कितीही त्रास झाला तरीही मागे न येणे, कुठचीही मजा, मस्ती, मनोरंजन मिळाले नाही तरीही कुरकुर न करणे या बाबी आजच्या पिढीला अनुकरणीय आहेत. आपापल्या जागी सुरक्षित रहा, आनंदाने रहा. एकमेकांवर केलेली कुरघोडी, स्वतःच्या ज्ञानाचा अहंकार स्वतःच्या नाशाला कारणीभूत होतात,याची शिकवण देणारा कोव्हीड माणसाने सदासर्वकाळ लक्षात ठेवला पाहिजे तरच आपली स्पंदने टिकून राहतील, असेच म्हणावेसे वाटते.

कोव्हीड बरोबरच अन्य व्हायरस, पर्यावरण, लसीकरण, मानवी मनाचे व्यवस्थापन, गुगल नेटचा जमाना, हर्ड इम्युनिटी, कोंबडीचा काढा, प्रॅक्टिस विदाउट लाईट, फॅमिली इन्व्हेस्टमेंट, पेशंटशी असलेले घट्ट नाते, इमोशनल इंटेलिजन्स, हेल्थकेअर हेल्दी सिस्टीम, सिंड्रोम एक्स,भीतीचा फोबिया,हरित पृथ्वी, ग्रॉईंग चाईल्ड, व्हेन्टीलेशन, आहे रे – नाही रे दरी असा मोठा कॅनव्हास वाचताना डॉक्टरांची तपस्या जागोजागी नवी ऊर्जा देते.

पंचावन्न वर्ष इतका प्रदीर्घ अनुभव असतानाही पंचाहत्तरी पार केलेल्या मेडिकल प्रॅक्टिशनर्सचे उरलेल्या वेळेतील जर्नल्स वाचन, अभ्यास खूप काही शिकवून जाते. हल्लीच्या डॉक्टर्सनी पेशंटची नाडी न पाहणे, आताच्या पिढीला मन – मेंदू – शरीर – वर्तन यांचे शिक्षण नसणे, जेवताना जे आले पाहण्यात ते आले खाण्यात ही चुकीची प्रवृत्ती याची जाणीव ठेवून निसर्गाप्रमाणे आपण बदलायला हवे. दोघांनाही आनंदात पुढे जायचे असेल तर त्याच्याशी तडजोड करीत, मैत्री करीत पुढे जाण्याचा दृष्टीकोनही समस्त मानव जातीस प्रेरणादायी आहे.

रुग्णाला एक हाडामासाचा गोळा न समजता त्याचे मन जाणणे, त्या मनाला समजावणे, गोंजारणे, सायन्सबरोबर घेऊन जाणे ही कला साध्य करण्याचे डॉ.शंकर विठ्ठल कलवारी यांचे आवाहन वेगवेगळ्या संदर्भाने ज्याने त्याने आपल्या व्यवसायात, पेशात, जीवनात जोडले तर भरभराट नक्की आहे, हे मात्र खरे!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button