रत्नागिरी

रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून मिऱ्या-नागपूर महामार्गावर उद्या भव्य सामूहिक वृक्षारोपण

हजारो वृक्षांचे एकाच वेळी रोपण; पालकमंत्री ना.उदय सामंत राहणार उपस्थित

नाणीज दि. २५ जुलै : जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून मिऱ्या-नागपूर महामार्गावरील पाली ते देवळे फाटा या मार्गाच्या दुतर्फा परिसरात रविवारी, दि. २६ जुलै रोजी भव्य सामूहिक वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी तसेच महाराष्ट्राचे उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, दुपारी ३.३० वाजता एकाच वेळी हजारो वृक्षांचे रोपण करून अनोखा विक्रम साकारणार आहे.

या उपक्रमात जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचे हजारो अनुयायी सहभागी होणार आहेत. पूर्वतयार करण्यात आलेल्या खड्ड्यांमध्ये दुपारी ३.३० वाजता सर्वजण एकाच वेळी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा सामूहिक संदेश देणार आहेत.

रत्नागिरी-नागपूर महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू होते. या कामा दरम्यान महामार्गालगतची सर्व झाडे तोडण्यात आली. त्यामुळे प्रवाशांना मिळणारी नैसर्गिक सावली कमी झाली. आता महामार्गाचे काम पूर्णत्वाकडे जात असताना परिसरात पुन्हा हिरवाई निर्माण व्हावी, पर्यावरणाचा समतोल राखला जावा आणि भावी पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण व्हावा, या उद्देशाने जगद्गुरु नरेंद्राचार्य संस्थानाने खास तामिळनाडूतून १० ते १२ फूट उंचीची झाडे आणली असून पांथस्थांना सावली मिळावी यासाठी मानवतावादी उपक्रम राबविण्यात येत आहे.

या अभियानांतर्गत आंबा, जांभूळ, वड, कदंब आणि पिंपळ यांसारख्या सावली देणाऱ्या वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. लागवड केली जाणारी रोपे सुमारे १० ते १२ फूट उंचीची असल्याने त्यांचे संवर्धन अधिक सुलभ होणार असून, अल्पावधीतच महामार्गालगतचा परिसर पुन्हा हिरवागार होण्यास मदत होणार आहे.

जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून ५ जुलै ते १९ जुलै या पंधरवड्यात देशभरात ६ लाख १८ हजारांहून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. त्याच पर्यावरणपूरक अभियानाचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेला हा सामूहिक वृक्षारोपण उपक्रम पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button