गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची शिरगावच्या कृषी संशोधन केंद्रात क्षेत्रभेट
चारसुत्री भातशेती, पाणी, माती परीक्षणाची घेतली माहिती

रत्नागिरी दि. २१ जुलै : गोगटे जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांची शिरगाव येथील कृषी संशोधन केंद्रात क्षेत्र भेट आयोजित करण्यात आली. विद्यार्थ्यांनी चारसुत्री लावणीच्या योग्य पद्धती, भाताच्या प्रजाती, संकलन, वितरणाची माहिती व पाणी, माती परीक्षणासंबंधी सविस्तर माहिती घेतली.
या क्षेत्रभेटीचे आयोजन एस. वाय. बी. एस.सी. च्या स्किल इन्हान्समेंट कोर्सअंतर्गत वॉटर अँड सॉईल ॲनालिसिस या शैक्षणिक अभ्यासक्रमाला अनुसरून करण्यात आले होते. या भेटीदरम्यान या केंद्राचे प्र. अधिकारी व कृषी पर्यवेक्षक डॉ. एन. जी. सोनोने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कृषी सहाय्यक राजेश सावंत आणि अजय जाधव यांनी विद्यार्थ्यांना कृषी संशोधन केंद्रातील संशोधन कार्य, गरजेनुसार विविध भात प्रजाती निर्माण करत असताना पाणी व माती परीक्षणाची गरज यावर मार्गदर्शन केले.
दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे कोकणातील कृषी क्षेत्रातील संशोधनपर कार्य याबद्दल सविस्तर माहिती दिली. याबरोबर मुलांना भात लावणीच्या विविध टप्प्यातील कामातही प्रत्यक्ष सहभागी होण्याची संधी प्राप्त झाली. क्षेत्रभेटीमध्ये ३२ विद्यार्थी व रसायनशास्त्र विभागाचे डॉ. उमेश संकपाळ, शिरीन लिमये, श्रीया सरपोतदार सहभागी झाले. याकरिता विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या व रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी नियोजन केले. प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांचे मार्गदर्शन लाभले.



