
जैतापूर दि. २१ जुलै : सुंदर वाडी परिसरातील वीज वाहिन्यांवरील झाडी तसेच एसटी बसच्या येण्या-जाण्याच्या मार्गात अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या हटविण्यासाठी ग्रामस्थांनी सोमवारी दिवसभर श्रमदान करून उल्लेखनीय सामाजिक उपक्रम राबविला. व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे करण्यात आलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत अनेक ग्रामस्थांनी आपली दैनंदिन कामे बाजूला ठेवून सकाळी १०.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत अथक परिश्रम घेत परिसरातील झाडी हटवून वीज वाहिन्या सुरक्षित केल्या तसेच एसटी बस वाहतुकीचा मार्ग मोकळा केला.
या मोहिमेतील सर्वाधिक जोखमीचे काम म्हणजे उंच झाडांवर चढून फांद्या तोडण्याचे होते. हे धाडसी काम रोहित मयेकर व जितेश नार्वेकर यांनी जीवाची पर्वा न करता यशस्वीरीत्या पूर्ण केले. वयस्कर असूनही शत्रुघ्न वाडेकर यांनी स्वतः झाडावर चढून श्रमदानात सहभाग घेत सर्वांसमोर प्रेरणादायी उदाहरण ठेवले.
प्रीतम वाडेकर, अशोक आंबोळकर, देवेंद्र करंगुटकर, अनिल नार्वेकर आणि राजेंद्र मयेकर यांनी झाडी-झुडपे हटवून परिसर स्वच्छ व सुरक्षित करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.
या उपक्रमात महावितरणचे कर्मचारी गजा लिंगायत, मराठे आणि अनिकेत चव्हाण यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून मशीनच्या साहाय्याने धोकादायक फांद्या काढण्याचे काम करून ग्रामस्थांना सहकार्य केले.
ज्येष्ठ ग्रामस्थ श्रीकांत करंगुटकर (नाना) व विश्वासभाई करंगुटकर यांनी दिवसभर उपस्थित राहून मोहिमेला पाठबळ दिले. विश्वासभाई करंगुटकर यांनी सर्व श्रमदान करणाऱ्या ग्रामस्थांसाठी चहा-नाश्त्याची व्यवस्था स्वतःच्या खर्चाने करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.
विशेष म्हणजे अनेक ग्रामस्थ सकाळपासून सायंकाळपर्यंत घरी जेवायलाही न जाता सातत्याने श्रमदान करत राहिले. गावाच्या सुरक्षिततेसाठी आणि सार्वजनिक सुविधांच्या संरक्षणासाठी ग्रामस्थांनी दाखविलेली एकजूट, समर्पणभावना आणि सामाजिक जबाबदारी सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली.
“आपले गाव, आपली जबाबदारी” या भावनेतून राबविण्यात आलेली ही श्रमदान मोहीम यशस्वी ठरली असून, या उपक्रमात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे तसेच महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे ग्रामस्थांनी मनःपूर्वक आभार मानले.



