
रत्नागिरी दि. १२ जुलै : रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे सलग तिसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या ‘रत्नागिरी ते पंढरपूर सायकलवारी’ या अनोख्या उपक्रमाला आज पहाटे ५ वाजता श्री विठ्ठल मंदिर येथून उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. वारीत ३० हून अधिक सायकलपटूंनी सहभाग घेतला असून, भक्ती, शिस्त, पर्यावरण संवर्धन आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देत ही वारी पंढरपूरकडे रवाना झाली.
या सायकलवारीचे प्रस्थान श्री विठ्ठल मंदिर देवस्थानचे कोषाध्यक्ष प्रमोद रेडीज व कार्यवाह राजन फाळके, तसेच हॉटेल व्यावसायिक गणेश धुरी यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून व झेंडा दाखवून करण्यात आले. श्री विठ्ठल मंदिर देवस्थानचे अध्यक्ष अशोक मयेकर, उपाध्यक्ष आनंद मराठे, विजय पेडणेकर यांच्यासह सर्व विश्वस्त मंडळींनी वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. विठ्ठल नामाचा गजर आणि टाळ-मृदंगाच्या गजरात सायकलवारीला उत्साहात प्रारंभ झाला.
या वारीमध्ये रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे अध्यक्ष महेश सावंत, उपाध्यक्ष दर्शन जाधव, सचिव डॉ. नितीन सनगर, खजिनदार योगेश मोरे, कार्यकारिणी सदस्य तसेच विशाल भोसले, योगेश सामंत, प्रसाद देवस्थळी, प्रसाद खेडेकर, राकेश होरंबे, वरद चुनेकर, अमित पोटफोडे, गजानन भातडे, ज्ञानेश्वर पांडे, पूजा कोसुंबकर, विनायक पावसकर, अमित जोशी, मृणाल वाडेकर, ओंकार फडके, निलेश शाह, मंगेश शिंदे, नारायण पाटोळे, अक्षय पोटफोडे, राहुल भोसले, अथर्व शेंड्ये, संतोष तावडे, विनायक कुऱ्हाडे, विकास कांबळे, स्नेहल भिसे, किरण चुंबळकर, तेजस ढवळे आणि ॲड. सचिन नाचणकर सहभागी झाले आहेत.
यंदाच्या वारीचे वैशिष्ट्य म्हणजे क्लबमधील केवळ २० वर्षांचा सर्वात तरुण सदस्य तसेच ७४ वर्षीय ज्येष्ठ सायकलपटू यांचाही उत्साहपूर्ण सहभाग. वयाला न जुमानता श्रद्धा, जिद्द आणि फिटनेसचा आदर्श या माध्यमातून सर्वांसमोर ठेवण्यात आला आहे.
सुमारे ३३० किलोमीटरचा हा प्रवास तीन दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी वारीचा मुक्काम उंब्रज (भोसलेवाडी) येथे होणार असून, शनिवारी संध्याकाळपर्यंत सायकलपटू पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी पोहोचतील. त्यानंतर रविवारी आयोजित करण्यात आलेल्या सायकल रिंगणात सहभागी होणार असून, या सोहळ्यात महाराष्ट्रभरातून पाच हजारांहून अधिक सायकल वारकरी सहभागी होण्याची अपेक्षा आहे.
ही सायकलवारी केवळ धार्मिक यात्रा नसून ‘भक्ती, शक्ती आणि पर्यावरण’ हा त्रिसूत्री संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. विठ्ठल नामाचा गजर करत आत्मिक समाधान मिळवणे, सायकलिंगद्वारे शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक ताकद वाढवणे तसेच पर्यावरणपूरक वाहतुकीचा प्रसार करून प्रदूषणमुक्त व हरित भविष्यासाठी जनजागृती करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. “भक्तीतून मिळे शक्ती, शक्तीतून घडते यश आणि पर्यावरण संवर्धन हीच आपली सामूहिक जबाबदारी” हा संदेश देत रत्नागिरी सायकलिस्ट क्लबची ही सायकलवारी श्रद्धा, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी संगम ठरत आहे.
मुग्धा सामंत यांची माऊलीचरणी गायनसेवा:
दि. ११ जुलै रोजी सायंकाळी ७.३० वाजता पंढरपूर येथे रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या सदस्य आणि प्रसिद्ध गायिका सौ. मुग्धा भट-सामंत विठ्ठल भक्तिरसाने ओतप्रोत गायन सेवा सादर करणार आहेत.



