गोल्डमेडलिस्ट राम सारंग यांना राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार

रत्नागिरी दि. ११ जुलै : राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र आणि जागृत नागरिक सेवा संस्था, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त आयोजित राज्य व राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात गोल्डमेडलिस्ट राम सारंग यांना राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे झालेल्या या सोहळ्यास खासदार छत्रपती शाहू महाराज, आमदार सतेज (बंटी) पाटील, असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकी जपत समाजहित, मानवता, जनकल्याण, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य तसेच गुणवंत कामगार म्हणून दिलेल्या योगदानाची दखल घेत राम सारंग यांना राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.
राम सारंग यांना यापूर्वीही गोल्ड मेडलसह विविध क्षेत्रांतील अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. सामाजिक उपक्रम राबविताना विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून स्वावलंबी होण्यासाठी सहकार्य केले आहे. विविध क्षेत्रांतील त्यांच्या सातत्यपूर्ण कार्याची दखल म्हणून मिळालेल्या या राष्ट्रीय सन्मानाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.



