गणपतीपुळे येथील कोल्हटकर तिठा ते मोरया चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याची अक्षरशः चाळण: वाहन चालकांमधून तीव्र नाराजी!

गणपतीपुळे दि. ७ (वैभव पवार) :- रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील कोल्हटकरतिठा ते मोरया चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे स्थानिक वाहन चालकांमधून आणि विशेषत: या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
गणपतीपुळे येथे कोल्हटकर तिठा ते मोरया चौक हा मुख्य मार्ग रहदारी व वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. मानला जातो त्यामुळे या रस्त्यावरून दररोज स्थानिकांपेक्षा पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते . तसेच याच मार्गावर गणपतीपुळे गावातील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा असल्याने प्राथमिक शाळेचे विद्यार्थी या शाळेकडे ये जा करीत असतात. परंतु गेल्या चार-पाच दिवसात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचून राहत आहे. तसेच ठिकठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यातून आणि साचलेल्या पाण्यातून विद्यार्थ्यांना येजा करावी लागते त्यामुळे पालक वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
तसेच या रस्त्यावरून वाहने जात असल्यामुळे अपघाताची भीतीही व्यक्त केली जाते. दरवर्षी या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था होत असताना संबंधित स्थानिक प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तसेच गणपतीपुळे परिसरात गणपतीपुळे पर्यटन विकास आराखड्यातून आपटा-तिठा ते मंदिर परिसराकडे जाणारे रस्ते कॉंक्रिटीकरण झाले आहेत परंतु हा मुख्य रस्ता काँक्रिटीकरण झालेला नसला तरी या रस्त्यावर तात्पुरत्या स्वरूपात उपायोजना करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. तसेच मालगुंड ते वरवडेकडे जाणाऱ्या आपठातिठा ते कोल्हटकर तिठा मुख्य मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. तसेच कोल्हटकर तिठ्यातील नाक्यात मोठया प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य दिसून येते या ठिकाणी देखील पावसाच्या पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात होत असल्याने वाहन चालकांसाठी हा रस्ता डोकेदुखी ठरतो. एकूणच पावसाळ्यात दरवर्षी होणारी ही समस्या लक्षात घेता गणपतीपुळे ग्रामपंचायतीने गांभीर्याने लक्ष घालून ही समस्या मार्गी लावावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यटकांकडून करण्यात आली आहे.



