गूढ – रम्य तरीही रसिकांच्या अंतर्मनाला भावणाऱ्या कलाकृती!
मनाली सैतवडेकरची चित्र उपनिषदावर आधारीत; युवा चित्रकर्त्रीची कलाक्षेत्रात मोठी भरारी

संगमेश्वर दि. २९ ( प्रतिनिधी ):- रसिकांचं अंतर्मन ओळखून त्यानुसार आपल्या कलाकृती रेखाटण्यावर भर देणारी एखादी कलाकार थेट उपनिषदांचा अभ्यास करून त्यावर आधारित कलाकृती रेखाटत असून, या कलाकृती जरी गुढ रम्य असल्या तरीही त्या रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. मूळची संगमेश्वर येथील असलेली मनाली सैतवडेकर या युवा चित्रकर्त्रीने रेखाटलेल्या कलाकृतींची कलाक्षेत्रात सर्वत्र वाहवा होत आहे.
संगमेश्वर हे मूळ गाव असणारी मनाली आपल्या वडिलांच्या नोकरी व्यवसायामुळे ठीक ठिकाणी वास्तव्याला होती. त्यामुळे तिचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण एकाच शाळेत न होता वेगवेगळ्या शाळेत झाले. नववीच्या इयत्तेत असताना संगमेश्वर येथील पैसा फंड इंग्लिश स्कूल येथे मनालीने प्रवेश घेतला. या शाळेत आल्यानंतर तिला कला विषयाबद्दल कुतूहल आणि याच विषयात आपण अभ्यास करावा असे वाटू लागले. कालांतराने पुढील शिक्षणासाठी तिला सांगलीला जावे लागले.
सांगली येथे गेल्यानंतर मनालीने वाणिज्य शाखेत शिक्षण घ्यावे असा वडील आग्रह करत होते. मात्र मनालीच्या मनात कला या विषयाचे उच्च शिक्षण घ्यावयाचे असल्याने तिने सांगली येथील कला विश्व महाविद्यालयात प्रवेश घेतला. कलाविश्व महाविद्यालयातून नामवंत कलाकार घडत गेले. अनेक कलाकारांच्या कला शैलीचा अभ्यास करत मनालीने चार वर्ष कठोर परिश्रम घेतले. कलाक्षेत्रात आपली नव्याने आणि स्वतंत्र ओळख व्हायला हवी असेल तर, स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणे आवश्यक आहे हे तिला ज्ञात झाले होते.
रेखा आणि रंग कला या विषयात डिप्लोमा प्राप्त केल्यानंतर मनालीने कलाक्षेत्रात स्वतंत्रपणे काम करण्यास सुरुवात केली. मनालीचा विवाह सचिन या कलाक्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या तरुणाशी झाल्यानंतर दोघांनी कलाक्षेत्रात प्रगती करण्यासाठी एका नव्या दिशेने वाटचाल सुरू केली. मनाली आणि सचिन यांनी ‘ सुखम ‘ या नावे एका स्टुडिओची स्थापना केली. राज्यातील कला महाविद्यालयात जाऊन मार्गदर्शन करणे, प्रात्यक्षिके दाखवणे, कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात सर्व कला साहित्य उपलब्ध करून देणे, कला महाविद्यालयात आणि शाळांमधून कार्यशाळा घेणे अशा स्तरावर त्यांनी काम सुरू केले. राज्यातील नामवंत कलाकारांच्या मुलाखती घेऊन त्यांचे प्रसारण करणे हा देखील एक अभिनंदनीय उपक्रम मनाली आणि सचिन यांनी सुरू केला आहे.
स्वतःच्या ‘ सुखम ‘ स्टुडिओमध्ये काम करत असताना मनालीने वेद आणि उपनिषदे यांचा अभ्यास केला हा अभ्यास करत असताना यातील अनेक गोष्टींचा आपल्याला कलाकृतीत वापर करता येईल असे मनालीच्या लक्षात आले. यातूनच तिने गुढ तसेच रम्य आणि रसिकांना एका वेगळ्याच भावविश्वात घेऊन जातील अशा कलाकृती रेखाटण्यास सुरुवात केली. या कलाकृती पाहिल्यानंतर रसिकांना आपण एका वेगळ्याच दुनियेत प्रवेश करत असल्याचा आभास होऊ लागला. अल्पावधीतच मनालीच्या या कलाकृतींची कलाक्षेत्रात वाहवा होऊ लागली. अनेक मान्यवरांनी मनालीची ही चित्रे विकत घेऊन आपल्या घरी दवाखान्यात अथवा हॉस्पिटल आणि कार्यालया मध्ये लावली.
सतत कलाकृती रेखाटत राहायचं आणि आपणच रेखाटलेल्या कलाकृतीतून नवीन काहीतरी शिकत जायचं असा ध्यास घेतलेल्या मनालीने आजवर असंख्य कलाकृती रेखाटल्या. यामुळेच आजवर मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली अशा अनेक ठिकाणी मनालीची सात वैयक्तिक चित्र प्रदर्शने झाली आहेत. याबरोबरच आजवर तिने ठीक ठिकाणी झालेल्या ९ समूह चित्र प्रदर्शनात भाग घेतला आहे. मनाली सैतवडकर या युवा चित्रकर्त्रीने अत्यंत कमी वयात कलाक्षेत्रात स्वतःच्या स्वतंत्र कलाशैलीने एक वेगळा ठसा उमटवल्याबद्दल संगमेश्वर वासियांना तिचा अभिमान वाटत आहे.



