रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यात उद्यापासून शाळा पूर्ववत दहा ते पाच या वेळेत भरणार

रत्नागिरी दि. २३ :- जिल्ह्यात बहुप्रतीक्षित मान्सूनचे सोमवारपासून धुवांधार आगमन झाले असून, वातावरणात निर्माण झालेल्या गारव्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाच्या या आगमनामुळे जिल्ह्यातील प्राथमिक शाळांची वेळ उद्या, बुधवारपासून (२४ जून २०२६) पुन्हा नियमित म्हणजेच सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० अशी होणार आहे.

यापूर्वी, मान्सून लांबल्यामुळे निर्माण झालेला प्रचंड उकाडा, उष्णतेची लाट आणि पाणीटंचाई या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी जिल्हा परिषदेने २२ जूनपासून शाळा तात्पुरत्या स्वरूपात सकाळी ७.०० ते ११.३० या सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेश दिले होते. मात्र, ‘पाऊस सुरू होईपर्यंत किंवा ३० जूनपर्यंत’ ही अट असल्याने, सोमवारी मान्सूनने हजेरी लावताच शाळांच्या वेळेत हा सुधारित बदल करण्यात आला आहे.

“चालू शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला मोसमी पाऊस लांबल्यामुळे आणि तीव्र उकाड्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून मुख्य कार्यकारी अधिकारी महोदयांच्या आदेशानुसार आपण २२ जूनपासून शाळा सकाळच्या सत्रात घेतल्या होत्या. परंतु, सोमवारपासून जिल्ह्यात मान्सूनचे समाधानकारक आगमन झाले असून उकाडा पूर्णपणे कमी झाला आहे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि हवामानातील सुधारणेचा फायदा व्हावा, म्हणून उद्या बुधवारपासून सर्व शाळा नियमित वेळेत (दहा ते पाच) सुरू होतील. सर्व गटशिक्षणाधिकारी आणि मुख्याध्यापकांनी याबाबत योग्य नियोजन करावे. पावसाळ्यात पालकांनी आणि शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याची व पिण्याच्या पाण्याची योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button