रत्नागिरी

देवरुखातील आगामी ५ वर्षांसाठी मालमत्ता कर निर्धारण प्रारुप याद्या प्रसिद्ध

७ जुलैपर्यंत आक्षेप नोंदवण्याचे आवाहन

देवरुख दि. १६ : महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ च्या कलम ११७ आणि ११८ नुसार, देवरुख नगरपंचायतीने भांडवली मूल्यावर आधारित सन २०२६-२७ ते २०३०-३१ या आगामी पाच वर्षांकरिता नगरपंचायत हददीतील इमारती आणि भूखंडांच्या कर निर्धारण याद्या तयार केल्या आहेत. या प्रारुप (ड्राफ्ट) याद्यांची प्राथमिक प्रसिद्धी करण्यात आली असून, त्यानुसार नागरिकांना आपल्या मालमत्ताकराच्या नोंदी तपासता येणार आहेत.

नगर रचनाकार रत्नागिरी तथा प्राधिकृत करमूल्य निर्धारण अधिकारी देवरुख यांनी या याद्यांची रीतसर तपासणी करून त्या देवरुख नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांकडे प्रसिद्धीसाठी सुपूर्द केल्या आहेत. त्यानुसार ८ जून २०२६ ते ७ जुलै २०२६ या कालावधीत या असेसमेंट करमूल्यांकन याद्या नागरिकांच्या माहितीसाठी नगरपंचायतीच्या ‘कर आकारणी व वसुली विभागात’ कार्यालयीन वेळेत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

आक्षेप नोंदवण्यासाठी ७ जुलै ही अंतिम मुदत

या जाहीर प्रसिद्धीतील कोणत्याही नोंदीबाबत जर एखाद्या मालमत्ताधारकास किंवा भोगवटाधारकास काही शंका, आक्षेप अथवा तक्रार असेल, तर त्यांनी ८ जून २०२६ ते ७ जुलै २०२६ या कालावधीत कार्यालयीन वेळेत ‘मुख्याधिकारी, नगरपंचायत देवरुख’ यांच्या नावे लेखी आक्षेप अर्ज सादर करणे आवश्यक आहे. ७ जुलै २०२६ या विहित मुदतीनंतर आलेल्या कोणत्याही आक्षेपांची दखल घेतली जाणार नाही, याची नागरिकांनी नोंद घ्यावी.

अधिनियमातील कलम ११९ अन्वये सर्व संबंधितांना स्वतंत्रपणे नोटिसा पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, तांत्रिक किंवा अन्य कारणांमुळे ज्या मालमत्ताधारकांना अद्याप नोटीस मिळालेली नसेल, त्यांनी तातडीने देवरुख नगरपंचायतीच्या कर विभागाशी संपर्क साधून आपली नोटीस प्राप्त करून घ्यावी आणि वेळेत कर निर्धारण याद्यांची पडताळणी करून घ्यावी, असे आवाहन मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button