
रत्नागिरी दि. १५ :- जिल्ह्यातील विविध बालगृहांमध्ये वास्तव्यास असलेल्या मुलांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला “बालगृहातील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप समारंभ” दिनांक १२ जून रोजी उत्साहात संपन्न झाला. या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील ९ बालगृहांमधील १२४ मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. व्ही. वाय. जाधव, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांची उपस्थिती लाभली. त्यांनी मुलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत आत्मविश्वासाने भविष्य घडविण्याचे आवाहन केले. मा. श्रीमती एस. एस. पिंगळे, मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी जागतिक बालकामगार विरोधी दिनाचे महत्त्व विशद केले. तर श्री. आर. आर. पाटील, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष प्रयत्न केले. श्री. विलास एस. पाटणे, अध्यक्ष, वकील संघ, रत्नागिरी यांनी मुलांना मार्गदर्शन केले
कार्यक्रमादरम्यान मुलांनी तयार केलेल्या हस्तकला वस्तू व कलाकृतींच्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उपस्थित मान्यवरांनी मुलांच्या सर्जनशीलतेचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले.
या उपक्रमासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व न्यायिक अधिकाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे योगदान देऊन शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
या उपक्रमामुळे बालगृहातील मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला नवी प्रेरणा, ऊर्जा आणि आत्मविश्वास मिळाला आहे.



