रत्नागिरी

सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉ. विजय कंदेवाड यांची रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य संस्थांना भेट

आरोग्य सेवांचा घेतला आढावा

रत्नागिरी, दि. ८ ऑगस्ट  : सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासनाचे संचालक डॉ. विजय कंदेवाड यांनी दि. ८ ऑगस्ट २०२६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील विविध आरोग्य संस्थांना भेटी देऊन आरोग्य सेवा तसेच विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला.

संचालक डॉ. विजय कंदेवाड यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र रामपूर, ता. चिपळूण, आयुष्मान आरोग्य मंदिर भिले, ता. चिपळूण, ग्रामीण रुग्णालय गुहागर तसेच तालुका आरोग्य अधिकारी, गुहागर कार्यालयास भेट दिली. यावेळी त्यांनी संबंधित आरोग्य संस्थांमधील विविध विभाग, उपलब्ध आरोग्य सुविधा, औषधसाठा, मनुष्यबळ तसेच नागरिकांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांची पाहणी करून कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.

आरोग्य सेवा अधिक प्रभावी, गुणवत्तापूर्ण व नागरिकाभिमुख पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या सूचना त्यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या. तसेच शासनाच्या विविध आरोग्य योजना व उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्यावर विशेष भर देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय कुमार कांबळे, डॉ. सत्यार्थ प्रकाश बळवंत तसेच चिपळूण तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव आदी उपस्थित होते. संबंधित आरोग्य संस्थांचे वैद्यकीय अधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांनी संचालकांना संस्थेच्या कामकाजाची माहिती दिली.

प्राथमिक आरोग्य केंद्र रामपूर येथे जिल्हा परिषद सदस्य प्रमोद निवळकर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन संचालक डॉ. विजय कंदेवाड यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्या श्रीमती सुप्रिया वंजारे, रामपूरच्या सरपंच श्रीमती अमिता चव्हाण, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

संचालक डॉ. विजय कंदेवाड यांनी आरोग्य संस्थांच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. नागरिकांना दर्जेदार, सुलभ, तत्पर व वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, आरोग्य संस्थांमध्ये स्वच्छता राखणे, उपलब्ध साधनसामग्रीचा प्रभावी वापर करणे तसेच शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यावर विशेष भर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व ग्रामीण स्तरावरील आरोग्य संस्थांमध्ये नागरिकांना आवश्यक आरोग्य सेवा प्रभावीपणे मिळण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने व जबाबदारीने काम करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

डॉ. अनिरुद्ध आठल्ये. जिल्हा आरोग्य अधिकारी. जिल्हा परिषद, रत्नागिरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button