रत्नागिरी

कोकण रेल्वेचे आजपासून विशेष मान्सून वेळापत्रक लागू

नवी मुंबई दि. १५ : कोकणातील मुसळधार पाऊस, सातत्याने निर्माण होणारा दरडी कोसळण्याचा धोका आणि कठीण भौगोलिक परिस्थितीचा यशस्वी सामना करण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने यंदाच्या मान्सूनसाठी अत्यंत व्यापक आणि चोख तयारी केली आहे. प्रवाशांची सुरक्षितता सर्वोच्च स्थानी ठेवावी आणि रेल्वे सेवा अखंडित राहावी यासाठी यंदा प्रथमच एआय-आधारित (कृत्रिम बुद्धिमत्ता) यंत्रणांसह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जाणार आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेसाठी १५ जून ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विशेष मान्सून वेळापत्रक लागू करण्यात आले आहे.

कोकण रेल्वे मार्गावरील अत्यंत संवेदनशील आणि भूस्खलनप्रवण भागांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने सॉइल शॉटक्रिटिंग, गॅबियन भिंती उभारणे आणि बोल्डर नेटिंगसारखी अत्यंत क्लिष्ट व महत्त्वाची तांत्रिक कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आली आहेत. मान्सूनच्या काळात रेल्वे मार्गावर चोवीस तास बारीक लक्ष ठेवण्यासाठी ६५७ प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची संवेदनशील ठिकाणी गस्तीसाठी विशेष नियुक्ती करण्यात आली आहे.

कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी चिपळूण, रत्नागिरी, कणकवली आणि वेरणा या चार महत्त्वाच्या स्थानकांवर आधुनिक उत्खनन यंत्रांसह विशेष वॅगन तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय नऊ ठिकाणी रेल्वे देखभाल वाहने आणि सात वेगवेगळ्या ठिकाणी टॉवर वॅगन देखील सज्ज ठेवण्यात आल्या आहेत, जेणेकरून तांत्रिक बिघाड झाल्यास तातडीने दुरुस्ती करता येईल.

सुरक्षेचा उपाय म्हणून या मार्गावरील नऊ स्थानकांवर स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्रे बसवण्यात आली असून, चार मोठ्या पुलांवर संभाव्य पूर परिस्थितीचा अंदाज घेणारी पूर इशारा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. तसेच पनवळ, मांडवी, झुआरी व शरावती या महाकाय पुलांवर वाऱ्याचा वेग मोजणारी अत्याधुनिक उपकरणे बसविण्यात आली आहेत, ज्यामुळे वादळी वाऱ्याची अचूक माहिती मिळून दुर्घटना टाळता येतील. या संपूर्ण व्यवस्थेवर देखरेख ठेवण्यासाठी बेलापूर, रत्नागिरी आणि मडगाव येथे २४ तास कार्यरत असणारे नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले असून, याद्वारे क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना तात्काळ एसएमएस पाठवून सतर्क केले जात आहे. रेल्वे ने घेतलेल्या या सर्व पूर्वकल्पना आणि उपाययोजनांमुळेच गेल्या संपूर्ण दशकात दरड कोसळून वाहतुकीत कोणताही मोठा व्यत्यय आला नसल्याचा महत्त्वपूर्ण दावा कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांनी एका पत्रकार परिषदेत केला.

या पत्रकार परिषदेला मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील नारकर देखील उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button