रत्नागिरी

रिव्हर्स घेताना अंदाज चुकला; डंपर ३५ फूट दरीत कोसळून चालकाचा मृत्यू

खेड दि. ११ : खेड तालुक्यातील सुकवली येथील खडी क्रशर परिसरात बुधवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात डंपर चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. रिव्हर्स घेत असताना चालकाचा अंदाज चुकल्याने डंपर सुमारे ३० ते ३५ फूट खोल दरीत कोसळल्याने हा अपघात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (ता. १०) सकाळी सुमारे ११.४० वाजण्याच्या सुमारास एमएच ०८ डब्ल्यू ८४७१ क्रमांकाचा डंपर सुकवली येथील खडी क्रशर परिसरात काम करत होता. यावेळी चालक वाहन रिव्हर्स घेत असताना मागील बाजूच्या अंतराचा अंदाज चुकला. त्यामुळे डंपरवरील नियंत्रण सुटून वाहन रस्त्यालगतच्या सुमारे ३० ते ३५ फूट खोल दरीत कोसळले.

अपघाताची तीव्रता इतकी होती की चालक गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच भरणे नाका पुलाखाली तैनात असलेली जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी संस्थान, नाणीजधाम यांची २४ तास विनामूल्य अपघात मदत रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहिका चालक सुरज हंबीर यांनी स्थानिकांच्या मदतीने जखमी चालकाला वाहनातून बाहेर काढून तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी येथे दाखल केले. मात्र, रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर नितीन विजय पवार (वय २७, रा. चिंचघर-दस्तुरी) यांना मृत घोषित केले.

या दुर्दैवी अपघातामुळे सुकवली परिसरात हळहळ व्यक्त होत असून नितीन पवार यांच्या निधनाने चिंचघर-दस्तुरी गावावर शोककळा पसरली आहे. घटनेचा पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button