दि बॉटनिकल गार्डनमधील झाडांचा पहिला वाढदिवस साजरा
आमदार शेखर निकम यांच्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण

रत्नागिरी, दि. ५ :- जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते येथील देवराई (दि बॉटनिकल गार्डन) मध्ये आज मोठ्या उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले. या निमित्ताने या गार्डनमधील झाडांचा पहिला वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि स्थानिक देवराईचे जतन करण्यासाठी या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ वृक्षारोपण करून न थांबता, विविध शासकीय विभागांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्र येत देवराईच्या संवर्धनासाठी प्रत्यक्ष श्रमदान केले. यामध्ये महसूल विभाग, कृषी विभाग, चिपळूण नगरपालिका आणि पंचायत समितीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या सर्वांनी संपूर्ण देवराई परिसराची स्वच्छता व झाडांना गांडूळ खत घालण्याचे काम केले.
या उपक्रमासाठी सहकार्य म्हणून सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील वाटंबरे येथील प्रसिद्ध ‘यशराज गांडूळ खत प्रकल्प’ यांच्या कडून या देवराईतील झाडांसाठी तब्बल १२०० किलो गांडूळ खत मोफत उपलब्ध करून देण्यात आले होते.
या उपक्रमामुळे कळंबस्ते देवराईला एक नवे रूप मिळाले आहे.



