रत्नागिरी

रत्नागिरी पोलिसांची ‘डायल ११२’ सेवेत उल्लेखनीय कामगिरी; राज्य पातळीवर थेट ७ व्या क्रमांकावर झेप!

रत्नागिरी दि. २३ :- रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या ‘डायल ११२’ या आपत्कालीन सेवा प्रणालीने नागरिकांना तात्काळ आणि जलद मदत पुरवण्यात उल्लेखनीय यश मिळवले आहे. प्रभावी नियोजन आणि तत्पर कामगिरीच्या जोरावर रत्नागिरी जिल्ह्याने ‘डायल ११२’ च्या सरासरी प्रतिसाद वेळेत लक्षणीय सुधारणा करत थेट महाराष्ट्र राज्यात ७ वा क्रमांक पटकावला आहे. यामुळे राज्यामध्ये पहिल्या १० जिल्ह्यांत येण्याचा मान रत्नागिरी पोलिसांना मिळाला आहे.

पोलीस नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत जिल्हा पोलिसांना एकूण ७,४०० कॉल्स प्राप्त झाले होते. त्यावेळी पोलिसांचा सरासरी प्रतिसाद वेळ ८.४५ मिनिटे इतका होता आणि जिल्हा राज्य पातळीवर ३२ व्या क्रमांकावर होता.

मात्र, चालू वर्षात जानेवारी २०२६ ते मे २०२६ या ५ महिन्यांच्या कालावधीत मिळालेल्या ९२१ कॉल्सवर कार्यवाही करताना हा सरासरी प्रतिसाद वेळ कमालीचा घटून ६.३४ मिनिटे इतका झाला आहे. याच कामगिरीमुळे जिल्ह्याने ३२ व्या क्रमांकावरून थेट ७ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे यांनी या सेवेकडे विशेष लक्ष दिले. त्यांनी ‘डायल ११२’ प्रणालीचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना योग्य सूचना व मार्गदर्शन केले. तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी यांच्यामार्फत दररोज या कामाचा आढावा घेऊन अडचणी सोडवल्या आणि सेवा अधिक जलद करण्यासाठी काटेकोर नियोजन केले.

पोलीस नियंत्रण कक्षात ‘डायल ११२’ वर कॉल येताच संबंधित पोलीस ठाणे आणि मोबाईल पथकांना त्वरित माहिती दिली जाते. यामुळे:

भांडणे, अपघात, कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न

महिलांविषयक तक्रारी

वैद्यकीय व इतर आपत्कालीन परिस्थिती

या सर्व घटनांमध्ये पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचत आहेत. वेळेत मदत मिळाल्यामुळे अनेक प्रकरणांमध्ये जीवितहानी टाळणे, वाद शांत करणे आणि नागरिकांना सुरक्षितता देणे शक्य झाले आहे.

नागरिकांनी ‘डायल ११२’ चा निर्धास्तपणे वापर करावा : पोलीस अधीक्षक

“भविष्यातही नागरिकांना अशीच तात्काळ आणि परिणामकारक सेवा देण्यासाठी रत्नागिरी पोलीस सातत्याने कार्यरत राहतील. सर्व अधिकारी व अंमलदारांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून, नागरिकांनी कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी ‘डायल ११२’ या क्रमांकाचा निर्धास्तपणे व विश्वासाने वापर करावा,” असे आवाहन पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button